भारत आणि इंग्लंड यांच्यातील मँचेस्टर कसोटी रद्द कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली. संघातील खेळाडू हा सामना खेळण्यासाठी मानसिकरीत्या तयार नसल्याचे कारण देत भारतीय संघाने हा सामना न खेळण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाच्या या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) आपले आर्थिक नुकसान झाल्याचे म्हटले आहे. मात्र, आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या कसोटी सामन्याची भरपाई म्हणून नवा प्रस्ताव ईसीबी समोर ठेवला आहे.
असा आहे नवा प्रस्ताव
मँचेस्टर कसोटी रद्द झाल्यानंतर बीसीसीआयने पुढील वर्षीच्या आपल्या मर्यादित षटकांच्या दौऱ्यावेळी दोन अतिरिक्त टी२० सामने याच मैदानावर खेळण्या विषयीचा प्रस्ताव दिला आहे. त्याचबरोबर, ही कसोटी त्या दौऱ्यावेळी खेळली जाईल हा पर्याय देखील खुला असून, त्याविषयी चर्चा केली जाईल. पुढील वर्षी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर तीन वनडे व तीन टी२० सामने खेळणार आहे. मात्र, एकूण आर्थिक नुकसानीचा विचार केल्यास ईसीबी अतिरिक्त टी२० साठी तयार होईल, याबाबत शंका व्यक्त केली जातेय.
मॅंचेस्टर कसोटीतून भारताची माघार
मॅंचेस्टर येथील पाचव्या कसोटीआधी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री व सहाय्यक फिजिओ योगेश परमार हे कोरोना बाधित आढळून आले होते. त्यामुळे, अखेरची कसोटी खेळली जाणार की नाही याबाबत शंका निर्माण झाली होती. सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी नकारात्मक आल्यानंतर कसोटी सुरू होईल अशी आशा व्यक्त केली गेली. मात्र, भारतीय खेळाडूंनी संभाव्य धोका न पत्करता कसोटी न खेळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे उभय देशांचे क्रिकेट बोर्ड आमने-सामने आले आहेत. ईसीबीने या निर्णयामुळे आपले ३०० पेक्षा अधिक कोटींचे नुकसान झाल्याचे म्हटले होते. तसेच त्यांनी या कसोटीच्या निकालासाठी आयसीसीने हस्तक्षेप करावा अशी मागणी केलेली.