जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा १४ वा हंगाम (आयपीएल) कोविड-१९ च्या भारतातील दुसऱ्या लाटेमुळे स्थगित केला गेला आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये सहभागी झालेले विदेशी खेळाडू लवकरात लवकर मायदेशी जाण्याचा प्रयत्न करताना दिसून आले. परंतु, ऑस्ट्रेलियन खेळाडूंना ऑस्ट्रेलिया सरकारच्या नियमांमुळे १४ दिवस मालदीवमध्ये राहावे लागले.
मालदीवमधील विलगीकरण संपवून आता ऑस्ट्रेलियन खेळाडू व कर्मचारी ऑस्ट्रेलिया दाखल झाले आहेत आणि सिडनीमध्ये विलगीकरणात राहत आहेत. मात्र, या खेळाडूंचा खर्च कोण करत आहे? या प्रश्नाचे उत्तर क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या पदाधिकाऱ्याने दिले आहे.
बीसीसीआयने पाळला दिलेला शब्द
आयपीएलचा चौदावा हंगाम ४ मे रोजी स्थगित केला गेल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू मायदेशी परतण्याच्या तयारीत होते. मात्र, दोन दिवस आधीच ऑस्ट्रेलियन सरकारने भारतातून येणाऱ्या विमानांसाठी ऑस्ट्रेलियाच्या सीमा बंद केल्या होत्या. त्यामुळे सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मालदीवमध्ये दहा दिवस विलगीकरणात राहावे लागले.
मालदीवमधील विलगीकरण संपवून ऑस्ट्रेलियन खेळाडू, प्रशिक्षक व इतर कर्मचारी मिळून ३८ जण सोमवारी (१७ मे) ऑस्ट्रेलियात पोहोचले. त्यानंतर हे सर्व खेळाडू सिडनीतील हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत.
ऑस्ट्रेलियन खेळाडू राहत असलेल्या हॉटेलचा सर्व खर्च बीसीसीआय करत असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अंतरिम सीईओ निक हॉकले यांनी सांगितले. हॉकले म्हणाले, “बीसीसीआयने शब्द दिल्याप्रमाणे मालदीव व ऑस्ट्रेलियातील खेळाडूंचा विलगीकरणाचा सर्व खर्च ते उचलत आहेत. ”
अचानकपणे आयपीएल करावी लागली स्थगित
स्पर्धेतील निम्म्याहून जास्त सामने पार पडल्यानंतर अचानकपणे विविध संघातील खेळाडू व कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. त्यामुळे बीसीसीआयने अनिश्चित काळासाठी स्पर्धा पुढे ढकलली. बीसीसीआयने आयपीएलचा पुढील हंगाम खेळण्याविषयी चाचपणी सुरू केली असून श्रीलंका, इंग्लंड किंवा यूएई यांनी आयपीएल आयोजित करण्याविषयी प्रस्ताव दिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंडची खेळाडू डॅनियल वॅटच्या लग्नाच्या प्रस्तावावर विराटच्या आईने दिली होती ‘अशी’ प्रतिक्रिया
रोहित किंवा पोलार्ड नाही तर ‘हा’ आहे अर्जुन तेंडूलकरचा आवडता मुंबई इंडियन्स संघातील खेळाडू
हरमनप्रीत कौर धावली बीसीसीआयच्या मदतीला, महिला संघाबाबत भेदभावाच्या आरोपांना दिले ‘हे’ उत्तर