ज्याप्रकारे सौरव गांगुलीने मॅच फिक्सिंगनंतर डगमगलेल्या भारतीय संघाला कर्णधार म्हणून उभे केले होते, अगदी त्याचप्रकारे दादाने बीसीसीआयचा अध्यक्ष बनल्यानंतरही उत्तम कामगिरी केली आहे.
संपूर्ण जगात एक प्रशासक म्हणून गांगुलीचे कौतुक केले जात आहे. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असणाऱ्या बीसीसीआय बोर्डाला गांगुली ज्याप्रकारे चालवत आहे. ते पाहून सर्व लोकांनी त्याला सलाम केला आहे.
इंग्लंडचा माजी कर्णधार डेव्हिड गॉवर (David Gower) यांचा तर असा विश्वास आहे की, गांगुलीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीचे नेतृत्व करण्यासाठी आवश्यक ‘राजनैतिक कौशल्य’देखील आहे.
गॉवर म्हणाले की, बीसीसीआयचा अध्यक्ष (President of BCCI) म्हणून गांगुलीने स्वत:ला सिद्ध केले आहे, जे सर्वात कठीण काम आहे. गॉवर गांगुलीच्या नेतृत्व क्षमतेने प्रभावित आहेत. त्यांचे असे मत आहे की गांगुलीकडे भविष्यात आयसीसीचे नेतृत्व करण्यासाठी आवश्यक समज आहे.
गॉवर यांनी ‘ग्लोफॅन्स’चा कार्यक्रम ‘क्यू २०’पूर्वी म्हटले की, “मी इतक्या वर्षांमध्ये जे काही शिकलो आहे ते असे की, बीसीसीआयचे नेतृत्व करण्यासाठी तुमच्याकडे अनेक प्रकारचे कौशल्य आणि समज असले पाहिजे. गांगुलीसारखी प्रतिष्ठा असणे बीसीसीआयसाठी (BCCI) खूप चांगली सुरुवात आहे. परंतु तुम्हाला एक खूप विनम्र राजनीतीतज्ज्ञ होण्याची आवश्यकता आहे.”
“लाखो गोष्टींवर तुमचे नियंत्रण असले पाहिजे. बीसीसीआयचे अध्यक्षाचे पद जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात कठीण कामांपैकी एक आहे. नक्कीच तुम्हाला खूप जबाबदार असले पाहिजे. भारतात क्रिकेटचे एक अब्जपेक्षा अधिक चाहते आहेत,” असेही गॉवर म्हणाले.
गॉवर पुढे म्हणाले की, “तो उत्तम व्यक्ती आहे. त्याच्याकडे राजनैतिक क्षमता आहे. त्याचा दृष्टीकोन योग्य आहे. तसेच गोष्टी एकत्र ठेवण्यात त्याचा हातखंडा आहे. तो चांगल्याप्रकारे काम करू शकतो. जर तुम्ही बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून काम पाहता, तेव्हा कोणालाच माहित नसते की, भविष्यात काय होऊ शकते?”
भारतीय संघाच्या या महान खेळाडूने बंगाल किंवा बीसीसीआयचा अध्यक्ष झाल्यावर देशांतर्गत क्रिकेटचा दर्जा उंचावण्यासाठी सतत प्रयत्न केले आहेत.