इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाला ९ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. त्यामुळे आता या हंगामाची तयारी सुरु झाली आहे. याबरोबरच या आयपीएल हंगामाआधी बीसीसीआयने सॉफ्ट सिग्नलबाबात एक मोठा निर्णय देखील घेतला आहे. तसेच शॉर्ट सन आणि नोबॉलबद्दलही बीसीसीआयने काही निर्णय घेतले आहेत.
बीसीसीआयने यंदाच्या आयपीएल हंगामातून सॉफ्ट सिग्नल काढून टाकला आहे. त्यामुळे आता ज्यावेळी मैदानावरील पंच तिसऱ्या पंचांची मदत मागतील त्यावेळी त्यांना सॉफ्ट सिग्नल द्यावा लागणार नाही. जो अंतिम निर्णय घ्यायचा आहे तो तिसरे पंचच घेतील.
काय आहे सॉफ्ट सिग्नल?
जेव्हा मैदानावरील पंचांना एखाद्या निर्णय देण्यात अडचण येते, त्यावेळी ते तिसऱ्या पंचांची मदत घेतात. परंतु, मदत घेताना त्यांना आपला एक निर्णय द्यावा लागतो, त्यालाच ‘सॉफ्ट सिग्नल’ असे म्हणतात. हा सिग्नल खेळाडू बाद किंवा नाबादचा असतो. पुढे पडताळणीनंतर जर तिसरे पंचही आपल्या निर्णयाबद्दल १०० टक्के खात्रीशीर नसतील किंवा त्यांना खेळाडू बाद किंवा नाबाद असल्याचा ठोस पुरावा मिळत नसेल तेव्हा मैदानावरील पंचांनी दिलेल्या सॉफ्ट सिग्नलच अंतिम निर्णय असतो. अशावेळी मैदानावरील पंचांनी दिलेला निर्णय महत्त्वाचा ठरतो.
भारतीय संघाला बसला सॉफ्ट सिग्नलचा फटका
१८ मार्च रोजी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पार पडलेला चौथा टी२० सामन्यादरम्यान भारताला सॉफ्ट सिग्नलमुळे फटका बसला होता. तो सामना भारताने जिंकला असला तरी त्या सामन्यात सॉफ्ट सिग्नलमुळे वाद निर्माण झाले होते. सुर्यकुमार यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांना मैदानावरील पंचांनी सॉफ्ट सिग्नल ‘बाद’ असा दिलेला असल्याने वादग्रस्त पद्धतीने विकेट गमवावी लागली होती. त्यामुळे अनेक वाद निर्माण झाले होते. तसेच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.
त्यानंतर आता स्पोर्ट्सस्टारने दिलेल्या वृत्तानंतर सॉफ्ट सिग्नल आयपीएलमध्ये तरी वापरण्यात येणार नाही, असा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.
शॉर्ट रन आणि नोबॉलचा निर्णय घेणार तिसरे पंच
शॉर्ट रन बाबतचा निर्णय हा नेहमी मैदानावरील पंच घेत असतात. मात्र, आता आयपीएल २०२१ मध्ये यात तिसऱ्या पंचांचा महत्त्वचा वाटा असणार आहे. जर तिसऱ्या पंचांना वाटले की मैदानावरील पंचांनी शॉर्ट रन बाबत चूकीचा निर्णय घेतला आहे, तर तिसरे पंच मैदानवरील पंचांचा निर्णय बदलू शकतात. याबरोबरच नोबॉलबाबतचा मैदानावरील पंचांचा निर्णय देखील तिसरे पंच बदलू शकतात.
दीडतासात पूर्ण करावा लागणार एक डाव
केवळ सॉफ्ट सिग्नल किंवा शॉर्ट रन बाबतच नाही तर सामन्याच्या कालावधीबद्दलही नियम करण्यात आले आहेत. प्रत्येक डावातील २० षटके हे ९० मिनिटात पूर्ण व्हायलाच हवेत, असा नियम करण्यात आला आहे. असे झाले नाही तर दंडाची कारवाई करण्यात येणार आहे. बदलेल्या नियमांबाबत आयपीएल गव्हर्निंग काउंन्सिलने सर्व संघांना माहिती दिली आहे.
या हंगामातून आयपीएलचे भारतात पुनरागमन होत आहे. मागील हंगाम कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे खेळवण्यात आला होता. पण यंदा सर्व सुरक्षेची व्यवस्था करत बीसीसीआयने आयपीएलचे आयोजन भारतात करण्याचेच ठरवले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
-INDvENG: ‘त्या’ नियमांमुळे निर्माण झाला वाद, आता स्वत: आयसीसीचं करणार आपल्या नियमांत बदल!
सचिनबरोबर ‘ज्या’ गोष्टीसाठी होते कर्णधार कोहलीची तुलना, ‘त्या’ गोष्टीला विराट देतोय शुन्य महत्त्व






