भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएलच्या येत्या हंगामात दोन नवीन संघांच्या समावेशासह इतरही आकर्षक बदल करण्याची तयारी सुरू केली आहे. चौदाव्या हंगामात दोन नवीन संघांच्या समावेशाने संघांची संख्या दहा होत असल्याने साखळी फेरीच्या सामन्यांचा प्रकार बदलण्याचा निर्णय बीसीसीआय घेणार आहे.
यापूर्वी २०११ साली आयपीएलमध्ये १० संघांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी १० संघांना साखळी सामन्यांसाठी दोन गटात विभागण्यात आले होते. हाच प्रकार येत्या हंगामात देखील लागू करण्यात येणार आहे. अर्थात याविषयीचा अंतिम निर्णय २४ डिसेंबरला होणार्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेतला जाईल.
नवीन संघ, मेगा ऑक्शन आणि बरंच काही
बीसीसीआय आयपीएलच्या येत्या हंगामात एका नवीन संघाचा समावेश करणार, हे निश्चित मानले जात होते. मात्र, आता एक नाही, तर दोन नवीन संघांचा समावेश करण्याचा प्रस्ताव बीसीसीआयच्या विचाराधीन असल्याचे समजते. या दोन संघांपैकी एका संघासाठी अहमदाबाद शहराचे नाव पक्के करण्यात आले असून, दुसर्या संघासाठी लखनऊ, पुणे आणि कानपूर शहरात स्पर्धा आहे. तसेच नवीन संघाचा समावेश असल्याने येत्या हंगामापूर्वी मेगा ऑक्शन देखील घेतले जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
या बदलांसह आता प्रकारामध्ये देखील बदल होणार असल्याची माहिती समोर येत आहे. नवीन संघांच्या समावेशाने संघांची संख्या दहापर्यंत पोहोचेल. अशावेळी जर साखळी सामने राऊंड-रॉबिन पद्धतीने घेण्यात आले, तर एका संघाला १८ सामने खेळावे लागतील. याने हंगाम गरजेपेक्षा अधिक लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखळी सामने राऊंड-रॉबिन पद्धतीने घेण्यापेक्षा दहा संघांची दोन गटांत विभागणी करून सामने खेळवण्याचा निर्णय घेतला जाईल. अशा पद्धतीने सामने यापूर्वी २०११ च्या आयपीएल हंगामातही खेळवण्यात आले होते.
संघमालकीसाठी स्पर्धा
आयपीएलच्या पुढील हंगामात दोन नवीन संघांचा समावेश होणार हे निश्चित झाल्याने आता या संघांची मालकी कोणाकडे असणार याबद्दल उत्सुकता वाढली आहे. या संघांच्या मालकीच्या शर्यतीत गौतम अदानी यांचा अदानी समूह आणि संजीव गोयंका यांचा आरपीजी समूह आघाडीवर आहेत. अदानी यांनी नुकतेच जाहीरपणे संघ विकत घेण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे सांगितले होते, तर दुसरीकडे गोयंका यांच्या मालकीच्या रायझिंग पुणे सुपरजायंट्स या संघाने यापूर्वी दोन वर्षांसाठी आयपीएलमध्ये सहभाग घेतला होता.
याव्यतिरिक्त दक्षिण भारतातील प्रसिद्ध अभिनेते मोहनलाल हेदेखील आयपीएल संघ खरेदी करण्यासाठी उत्सुक असल्याचे समजते. त्यांनी संयुक्त अरब अमिरातीत झालेल्या आयपीएलच्या मागील हंगामात काही सामन्यांना हजेरी देखील लावली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
एकाही आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व न करणारा युवा खेळाडू आहे वॉर्नरचा फेव्हरेट
“झहीरने गांगुलीच्या नेतृत्वात जशी कामगिरी केली, तशीच टी नटराजन विराटच्या नेतृत्वात करू शकतो”
मोठी बातमी! कोरे अँडरसनची न्यूझीलंड क्रिकेटमधून निवृत्ती; आता ‘या’ देशात खेळणार क्रिकेट
ट्रेंडिंग लेख-
अखेर तीन दिवसांच्या प्रतिक्षेनंतर एमएस धोनीचे झाले होते कसोटी पदार्पण
HBD गब्बर : चाहत्यांच्या नजरेत भरलेल्या शिखर धवनच्या ३ सर्वोत्कृष्ट खेळी
मराठीत माहिती- क्रिकेटर शिखर धवन