भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) सध्या भारतीय संघाच्या नव्या आहार योजनेवरुन (डाएट प्लॅन) विवादात अडकला आहे. बीसीसीआयने भारतीय क्रिकेटपटूंना हलाल सर्टिफाइड मांस खाणे बंधनकारक केल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टिका होते आहे. त्यानंतर ट्वीटरवर #BCCI_Promotes_Halal हा हॅशटॅगही ट्रेंडमध्ये आला होता. परंतु आता या संपूर्ण विवादावर बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांनी स्पष्टीकरण दिले आहे. भारतीय खेळाडूंच्या आहारावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसून त्यांना स्वत:चा आहार निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले असल्याचे धुमाळ यांचे म्हणणे आहे.
‘इंडिया टुडे’सोबत बोलताना धुमाळ म्हणाले की, “खेळाडूंसोबत त्यांच्या आहारवरुन कधीही चर्चा झालेली नाही आणि आम्ही अशा आहाराच्या योजनेबद्दल कधी काही ऐकलेलेही नाही. माझ्या माहितीनुसार, आम्ही भारतीय खेळाडूंच्या आहाराच्या योजनेसंबंधी कोणत्याही प्रकारची गाइडलाइन जाहीर केलेली नाही. खेळाडूंना त्यांच्या वैयक्तिक पसंतीनुसार अन्न निवडण्याची मुभा आबे. याबाबत बीसीसीआयची त्यांच्यावर कसलीही सक्ती नाही.”
तसेच पुढे बोलताना धुमाळ म्हणाले की, “हलाल मांसाची गोष्ट एखाद्या खेळाडूच्या अभिप्रायातून बाहेर आली असावी. उदाहरण घेऊन सांगायचे झाल्यास, समजा एखादा खेळाडू बीफ खात नसेल आणि अशात एखादा परदेशी संघ भारतात आला. तर यावेळी सर्वांच्या अन्नाच्या मिश्रण नाही केले गेले पाहिजे.”
अशा उडालेल्या अफवा
यापूर्वी माध्यमांमध्ये अशी चर्चा चालू होती की, नव्या आहार योजनेनुसार भारतीय क्रिकेटपटूंना कोणत्याही प्रकारचे पॉर्क किंवा बीफ खाण्याची परवानगी दिली गेलेली नाही. क्रिकेटपटूंच्या तंदुरुस्ती आणि तब्येतीला पाहता हे पाऊल उचलले गेले आहे. जर कोणत्याही क्रिकेटपटूला मांस खायचे असल्यास त्याला हलाल सर्टिफाइड मांसच खावे लागणार आहे. अन्यथा ते कोणत्याही प्रकारचे मांस खाऊ शकत नाहीत.
क्रिकेटचा येता नवा हंगाम आणि आयसीसीच्या जागतिक स्तरावरील वेगवेगळ्या क्रिकेट स्पर्धांदरम्यान भारतीय क्रिकेटपटूंना फिट ठेवण्यासाठी बीसीसीआयने त्यांच्या आहाराच्या योजनेबाबत कठोरता दाखवली आहे. या आहार योजनेद्वारे कोणाचेही वजन वाढू नये याचीही काळजी घेण्यात आली आहे.
कोरोना महामारीमुळे क्रिकेटपटूंना सतत जैव सुरक्षित वातावरणात राहावे लागत आहे. यामुळे त्यांना सातत्याने क्रिकेट खेळण्यात अडचणी येत आहेत. तसेच ते प्रत्येक स्वरुपात त्यांची उर्जा टिकवून ठेवू शकत नाहीयत. त्यामुळे क्रिकेटपटूंना त्यांच्या आहारसंबंधी सतर्कता बागळायला सांगितले गेले आहे. त्यातही जे क्रिकेटपटू मांसाहारी आहेत आणि ज्यांना रोज मांस खाण्याची सवय आहे, त्यांना आपल्या आहारावर विशेष लक्ष देण्यास सांगितले गेले आहे.