आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे अनेक भाऊ आहेत ज्यांनी एकत्र क्रिकेट खेळले आहे. यामध्ये इरफान पठाण-युसूफ पठाण, हार्दिक पांड्या-कृणाल पंड्या या खेळाडूंच्या नावांचा समावेश आहे. मात्र आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगळेच दृश्य पाहायला मिळणार आहे. इंग्लंडचे क्रिकेटपटू भाऊ सॅम करन आणि टॉम करन यांचा भाऊ बेन करन याने मोठा निर्णय घेतला आहे. सॅम करन आणि टॉम करन इंग्लंडकडून खेळतात, पण त्यांचा भाऊ बेन करन दुसऱ्या देशासाठी खेळताना दिसणार आहे.
एकाच कुटुंबातील मुले वेगवेगळ्या देशांसाठी खेळतील
टॉम करन आणि सॅम करन यांचा भाऊ बेन आपल्या क्रिकेट कारकिर्दीचा नवीन प्रवास सुरू करण्यासाठी सज्ज झाला आहे. 28 वर्षीय बेन करन लवकरच झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसणार आहे. बेन आता झिम्बाब्वेकडून खेळण्यास पात्र आहे आणि त्याने स्वत:ला निवडीसाठी उपलब्ध करून दिले आहे. बेन काही काळापासून झिम्बाब्वेमध्ये देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे. याआधी तो आपल्या दोन भावांप्रमाणे इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळत असे.
बेनने आपल्या काऊंटी कारकिर्दीची सुरुवात सर्रे संघाकडून केली होती. यानंतर तो नॉर्थम्प्टनशायर संघाकडून खेळला. तेथे त्याने एमसीसी यंग क्रिकेटर्सकडून खेळताना संघाला प्रभावित केले. 2022 मध्ये नॉर्थम्प्टनशायरमध्ये चार वर्षे संपल्यानंतर त्याने झिम्बाब्वे संघात परतण्याचा निर्णय घेतला होता. या तीन भावांचे वडील केविन करन हे झिम्बाब्वेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत आणि या तिन्ही भावांनी त्यांचे बालपण तिथेच घालवले आहे.
केविन करन झिम्बाब्वेकडून क्रिकेट खेळलेत
केविन करन हे अष्टपैलू खेळाडू होते. त्यांनी झिम्बाब्वेसाठी 11 वनडे सामन्यांमध्ये 287 धावा आणि 9 विकेट्स घेतल्या होत्या. यानंतर ते इंग्लंडला गेला आणि तिथली त्याची काउंटी कारकीर्द खूप यशस्वी झाली. नॉर्थम्प्टनशायरकडून खेळताना त्यांनी पाच वेगवेगळ्या मोसमात 1000 धावा केल्या. यानंतर ते पुन्हा एकदा झिम्बाब्वेला परतले. कालांतराने ते पुढे झिम्बाब्वे संघाचे मुख्य प्रशिक्षकही झाले. त्यामुळे त्यांच्या मुलांना आफ्रिकन देशात वाढण्याची संधी मिळाली. पण 2012 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची मुले पुन्हा इंग्लंडला गेली.
बेन करनची आतापर्यंतची कारकीर्द
28 वर्षीय बेनने आतापर्यंत 42 प्रथम श्रेणी सामने, 32 लिस्ट ए सामने आणि 30 टी20 सामने खेळले आहेत. त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत त्याने 31.73 च्या सरासरीने 2063 धावा केल्या आहेत ज्यात 2 शतके आणि 10 अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट ए मध्ये त्याच्या नावावर 28.50 च्या सरासरीने 741 धावा आहेत. टी20 मध्येही त्याने 21.29 च्या सरासरीने 575 धावा केल्या आहेत. यासोबतच त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 2 विकेट्सही घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
गेल्या वेळी अनसोल्ड राहिले, आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात या खेळाडूंवर होईल पैशांचा वर्षाव
रोहित शर्माने मुंबई इंडियन्स सोडावी का? माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य
बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेत ‘या’ स्टार खेळाडूंना मिळणार विश्रांती! इशानला होऊ शकतो फायदा