विश्वचषक 2023 स्पर्धेत 40 वा सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअम येथे खेळला गेला. या सामन्यात गतविजेता इंग्लंड विरुद्ध नेदरलँड्स संघ आमने-सामने आले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघाने 339 धावा उभारल्या. इंग्लंड संघासाठी अनुभवी बेन स्टोक्स याने शानदार शतक झळकावले. यासह त्याने इंग्लंड क्रिकेटमधील एक मोठा विक्रम आपल्या नावे जमा केला.
स्पर्धेतील आव्हान यापूर्वी संपुष्टात आलेल्या इंग्लंड साठी आपले अखेरचे दोन सामने प्रतिष्ठेचे आहेत. त्यातील नेदरलँड्स विरुद्धच्या सामन्यात इंग्लंडने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केला. डेव्हिड मलान याने 87 धावा करून केलेल्या सुरुवातीनंतर बेन स्टोक्स व ख्रिस वोक्स यांनी अनुक्रमे 108 व 51 धावा करत संघाला 339 पर्यंत नेले.
बेन स्टोक्स याने 78 चेंडूवर शतक पूर्ण केल्यानंतर बाद होण्यापूर्वी 84 चेंडूवर 6 चौकार व 6 षटकारांच्या मदतीने 108 धावा केल्या. हे त्याच्या वनडे कारकिर्दीतील पाचवे तर विश्वचषकातील पहिले शतक ठरले. या खेळी दरम्यान त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावांचा टप्पा देखील पार केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा व 250 बळी अशी कामगिरी करणारा तो जगातील दहावा व इंग्लंडचा पहिला क्रिकेटपटू बनला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत अशी कामगिरी दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस, श्रीलंकेचा सनथ जयसूर्या, बांगलादेशचा शाकिब अल हसन, वेस्ट इंडीजचे कार्ल हूपर व ख्रिस गेल, पाकिस्तानचे शाहिद आफ्रिदी व मोहम्मद हफिज आणि ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉटसन व स्टीव वॉ यांनी केली होती. विशेष म्हणजे या यादीत भारत व न्यूझीलंडचा एकही खेळाडू नाही.
(Ben Stokes Become First Englishman Who Took 250 Wickets And 10000 Runs In International Cricket)
हेही वाचा-
सत्ता आपलीच! नव्या गोलंदाजी क्रमवारीत टीम इंडियाचा पूर्ण तोफखाना ‘टॉप 10’मध्ये! सिराज पुन्हा नंबर वन
हा वर्ल्डकप विक्रमांचा! 48 वर्षांच्या इतिहासात कुठल्याच हंगामात न घडलेला रेकॉर्ड CWC 2023मध्ये घडला, वाचाच