---Advertisement---

कोहली, सिराजशी झालेल्या शाब्दिक वादाबद्दल बेन स्टोक्सने मांडली बाजू, म्हणाला…

On: शनिवार, मार्च 6, 2021 9:05 AM
---Advertisement---

कोणत्याही क्रिकेट सामन्यात प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंमध्ये छोटे-मोठे वाद होत असतात. अहमदाबाद येथे भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात चालू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यातही असा प्रसंग घडला होता. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या षटकात इंग्लंडचा फलंदाज बेन स्टोक्स आणि भारतीय कर्णधार विराट कोहली यांच्यात शाब्दिक युद्ध पेटले होते. स्टोक्सने अपशब्द वापरल्याने या विवादाची सुरुवात झाल्याचे स्पष्टीकरण सिराजने दिले होते. यानंतर आता स्टोक्सने या प्रसंगाबद्दल आपली बाजू मांडली आहे.

या शाब्दिक चकमकीबद्दल प्रतिक्रिया देताना स्टोक्स म्हणाला की, “आजकाल क्रिकेट खेळत असलेल्या दोन संघांतील खेळाडूंमध्ये बाचाबाची होणे साधारण होणे. परंतु ही साधारण घटना फार लवकर चर्चेचा विषय ठरते आणि याला वेगवेगळे रंग चढवण्याचा प्रयत्न केला जातो. आम्ही एकमेकांविरुद्ध खेळत आहोत. परंतु कोणाला कमी लेखण्याची आमची अजिबात इच्छा नाही. प्रतिस्पर्धी संघांचे खेळाडू सहज बोलत जरी असतील, तरी असे वाटते की आम्ही काही चुकीचे केले आहे.”

“या गोष्टींना वेगळ्या बाजूने पाहण्याची आवश्यकता आहे. आम्ही आपापल्या संघांचे प्रतिनिधित्त्व करतो आहोत आणि आम्हाला याची काळजी आहे. जेव्हा आपण एकमेकांचा सामना करतो तेव्हा प्रतिद्वंदी व्हावे लागते. परंतु हे पाहून चांगले वाटले की, दोन्ही संघाचे खेळाडू कोणत्याही गोष्टीवर माघार न घेता सद्यस्थितीचा धैर्याने सामना करतात. विराट किंवा सिराजशी माझा संवाद इतकाच होता की, दोन प्रतिस्पर्धी खेळाडू एकमेकांवर मात करण्याचा प्रयत्न करत होते,” असे पुढे त्याने सांगितले.

नक्की काय झाले?

झाले असे की चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंड संघ पहिल्या डावात फलंदाजी करत असताना डावातील १५ वे षटक युवा गोलंदाज सिराज टाकत होता. सिराजने त्याच्या षटकातील पहिलाच चेंडू अतिशय वेगाने टाकला, ज्यावर स्टोक्सला शॉट मारता आला नाही. पंचांनी तो चेंडू नो बॉल असल्याचेही घोषित केले. यानंतर सिराज आणि स्टोक्समध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे दिसले.

त्यानंतर लगेचच विराट मध्ये पडला. त्यामुळे नंतर विराट आणि स्टोक्समध्येच शाब्दिक युद्ध पेटले. काही वेळ त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर पंच नितीन मेनन यांनी मध्यस्थी करत त्यांचा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---