जयपूर। आयपीएल 2019 मध्ये गुरुवारी(11 एप्रिल) राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात 25 वा सामना पार पडला. सवाई मानसिंग क्रिकेट स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात शेवटच्या चेंडूवर चेन्नईने 4 विकेट्सने विजय मिळवला.
याच सामन्यात राजस्थानचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सने चेन्नईचा फलंदाज केदार जाधवचा अफलातून झेल घेतला. त्यामुळे त्याला सामन्यातील सर्वोत्कृष्ट झेलचा पुरस्कारही देण्यात आला.
या सामन्यात चेन्नईचा संघ राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना दिलेल्या 152 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना सुरुवातीला संघर्ष करत होता. त्याचवेळी जोफ्रा आर्चर गोलंदाजी करत असलेल्या सहाव्या षटकातील पाचव्या चेंडूवर जाधवने कट शॉट खेळायचा प्रयत्न केला.
पण चेंडू पॉइंटच्या दिशेने गेला. तिथे स्टोक्स क्षेत्ररक्षण करत होता. त्याने चेंडू त्याच्या बाजूला येत असल्याचे पाहताच डाव्या बाजूला उडी मारत हवेतून तो चेंडू झेलला आणि जाधवला बाद केले. त्यामुळे चेन्नईला 24 धावांवरच चौथा धक्का बसला.
https://twitter.com/IPL/status/1116390281966804997
पण त्यानंतर मात्र चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी आणि अंबाती रायडूने अर्धशतकी खेळी करत चेन्नईच्या डावाला आकार दिला. या दोघांनी मिळून 5 व्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी केली. पण स्टोक्सनेच या दोघांना बाद केले. त्याने 18 व्या षटकात 57 धावांवर रायडूला आणि 20 व्या षटकात 58 धावांवर धोनीला बाद केले.
पण शेवटच्या षटकात चेन्नईकडून मिशेल सँटेनर आणि रविंद्र जडेजाने जबाबदारीने फलंदाजी केली आणि शेवटच्या चेंडूवर 3 धावांची गरज असताना सँटेनरने षटकार ठोकत चेन्नईला विजय मिळवून दिला.
या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 151 धावा केल्या होत्या.
तसेच गोलंदाजीत चेन्नईकडून दिपक चहर, शार्दुल ठाकूर आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स आणि मिशेल सँटेनरने 1 विकेट घेतली. तर राजस्थानकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर धवल कुलकर्णी, जयदेव उनाडकट आणि जोफ्रा आर्चर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
–राजस्थान विरुद्धच्या सामन्यात धोनीकडून रविंद्र जडेजाला बसला मार, पहा व्हिडिओ
–रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या मदतीला येणार हा दिग्गज गोलंदाज
–रविंद्र जडेजा, एमएस धोनीने केली ही खास सेंच्यूरी पूर्ण…






