लंडन। रविवारी(14 जूलै) 2019 आयसीसी क्रिकेट विश्वचषकातील इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात झालेल्या नाट्यपूर्ण अंतिम सामन्यात सुपर ओव्हरही बरोबरी सुटल्यानंतर बाऊंड्रीच्या फरकांमुळे इंग्लंडला विश्वविजेता घोषित करण्यात आले. त्यामुळे इंग्लंडचे 44 वर्षांनंतर विश्वचषक विजयाचे स्वप्न पूर्ण झाले.
या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 241 धावा केल्या होत्या आणि इंग्लंडला विजयासाठी 50 षटकात 242 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडलाही 50 षटकात सर्वबाद 241 धावाच करता आल्या. त्यामुळे सुपर ओव्हर घेण्यात आली.
सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 15 धावा केल्या. यावेळी न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने गोलंदाजी केली होती. तर नंतर न्यूझीलंडलाही सुपर ओव्हरमध्ये 15 धावाच करता आल्या. यावेळी इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने गोलंदाजी केली होती.
जोफ्रा आर्चरने टाकलेल्या या सुपर ओव्हरची सुरुवात वाईड बॉलने झाली होती. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर जिमी निशामने आर्चरला षटकार मारला होता. त्यामुळे शेवटच्या चार चेंडूंवर सात धावांची न्यूझीलंडला गरज होती. पण आर्चरने पुढील चार चेंडूत सहा धावाच दिल्या.
ही सुपर ओव्हर टाकण्याआधी जोफ्रा आर्चरला इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सने खास संदेश दिला होता. या संदेशाचा खूलासा आर्चरने सामना संपल्यानंतर केला आहे.
आर्चर म्हणाला, ‘मला वाटते तो षटकार जाईपर्यंत सर्व ठिक होते. स्टोक्सने मला या सुपर ओव्हरच्या आधीही सांगितले होते की आज आपण जिंकलो किंवा हरलो तरी यामुळे तुझे मुल्यांकन होणार नाही. तूझ्यावर सर्वांचा विश्वास आहे.’
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शेवटचे षटक टाकताना गोलंदाजावर असणारा दबाव याआधी स्टोक्सने 2016 च्या टी20 विश्वचषकात अनुभवला आहे.
कोलकाताला झालेल्या या टी20 विश्वचषकातील अंतिम सामन्यात वेस्ट इंडीज विरुद्ध इंग्लंडकडून शेवटचे षटक स्टोक्सने टाकले होते. या षटकात वेस्ट इंडिजच्या कार्लोस ब्रेथवेटने सलग 4 षटकार मारत वेस्ट इंडीजला विश्वचषक जिंकून दिला होता. त्यामुळे या घटनेची आठवण ठेवत स्टोक्सने रविवारी सुपर ओव्हरदरम्यान आर्चरला प्रेरणा दिली होती.
याबद्दल आर्चर म्हणाला, ‘कोलकाताला जे झाले त्याची आठवण ठेवून तो माझ्याशी बोलत होता. तो या भावनेतून गेला आहे. पण त्यावेळी संघ पराभूत झाला होता.’
‘जर आज आम्ही हरलो असतो तर मला माहित नाही उद्या मी काय केले असते. त्याने(स्टोक्सने) मला पाठिंबा देण्यासाठी म्हटले की आपण जरी आज हरलो तरी पुढील वर्षी टी20 विश्वचषक आहे. त्यामुळे माझ्याकडे आणखी एक संधी आहे.’
तसेच आर्चर पुढे म्हणाला, ‘जो रुटनेही माझ्या जवळ येऊन मला प्रेरणा दिली होती. मला माहित आहे की जरी आम्ही हरलो असतो तरी हा जगाचा अंत नव्हता. मला आनंद आहे की या सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवला.’
आर्चर इंग्लंडकडून एका विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने या विश्वचषकात 11 सामन्यात 4.57 च्या इकोनॉमी रेटने 20 विकेट्स घेतल्या आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विश्वचषक२०१९ च्या सर्वोत्तम ११ जणांच्या संघात आयसीसीने केली या दोन भारतीय खेळाडूंची निवड
–…म्हणून मोईन अली, आदील राशिदने घेतला नाही इंग्लंडच्या सेलिब्रेशनमध्ये सहभाग
–…आणि बेन स्टोक्सने मागितली केन विलियम्सनची माफी