---Advertisement---

आयएसएल २०२०-२१ : ईस्ट बंगालविरुद्ध अखेर बेंगळुरूला विजय

On: मंगळवार, फेब्रुवारी 2, 2021 10:30 PM
---Advertisement---

गोवा| हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात माजी विजेत्या बेंगळुरू एफसीची विजयाची प्रतिक्षा अखेर एससी ईस्ट बंगालविरुद्ध संपुष्टात आली. स्वयंगोलचीही साथ मिळाल्यामुळे बेंगळुरूने 2-0 असा विजय मिळविला. आठ सामन्यानंतर बेंगळुरूला अखेर निर्णायक विजय गवसला.

वास्को येथील टिळक मैदानावर हा सामना झाला. मध्य फळीतील ब्राझीलचा 33 वर्षीय खेळाडू क्लेईटन सिल्वा याने 12व्या मिनिटाला बेंगळुरूचे खाते उघडले. त्यानंतर पहिल्या सत्राच्या अखेरच्या मिनिटास ईस्ट बंगालचा गोलरक्षक देबजीत मजुमदार याच्याकडून स्वयंगोल झाला.

बेंगळुरूने आठवरून सहावे स्थान गाठले. 15 सामन्यांत त्यांनी चौथा विजय मिळविला असून सहा बरोबरी व पाच पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 18 गुण झाले. सातव्या क्रमांकावरील जमशेदपूर एफसीचेही 18 गुण आहेत, पण बेंगळुरूचा 0 (19-19) गोलफरक जमशेदपूरच्या उणे 3 (14-17) पेक्षा सरस आहे. चौथ्या व पाचव्या क्रमांकावरील एफसी गोवा आणि नॉर्थईस्ट युनायटेड एफसी यांचे प्रत्येकी 21 गुण आहेत, मात्र या दोन्ही संघांचा एक सामना बाकी आहे. त्यातही गोव्याचा 5 (19-14) गोलफरक नॉर्थईस्ट युनायटेडच्या 1 (19-18) पेक्षा सरस आहे.

ईस्ट बंगालला 15 सामन्यांत सहावा पराभव पत्करावा लागला. दोन विजय व सात बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे 13 गुण व शेवटून दुसरे म्हणजे दहावे स्थान कायम राहिले.

खाते उघडण्याची शर्यत बेंगळुरूने जिंकली. बेंगळुरूच्या बॉक्सच्या किंचीत बाहेर मिळालेली फ्री-किक गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधू याने घेतली. चेंडू येताच कर्णधार सुनील छेत्रीने ईस्ट बंगालचा बचावपटू स्कॉट नेव्हील याच्यापेक्षा उंच उडी घेत हेडिंगद्वारे संधी निर्माण केली. सिल्वाने आपल्या दिशेने चेंडू येताच दमदार किक मारून फिनिशींग केले.
सिल्वाने या गोलनंतर ईस्ट बंगालचा कर्णधार डॅनिएल फॉक्स याच्यासमोर जात जल्लोष केला. त्याआधी या दोघांत वादावादी झाली होती.

पूर्वार्धातील अखेरच्या मिनिटात बेंगळुरूला स्वयंगोलची साथ मिळाली. बचावपटू राहुल भेके याने उजवीकडून आगेकूच केली. त्याने गोलक्षेत्रात प्रवेश करीत फटका मारला. त्यावर बदली मध्यरक्षक पराग श्रीवस याने प्रयत्न केला, पण त्याने मारलेला चेंडू गोलपोस्टला लागला. त्यावेळी मजुमदारने हालचालच केली नाही. मग काही क्षणांत चेंडू त्याच्या पायाला लागून नेटमध्ये गेला. दोन गोलांचे वर्चस्व बेंगळुरूने अखेरपर्यंत अबाधित राखले.

संबधित बातम्या:

आयएसएल २०२०-२१ : ओदीशाला हरवून जमशेदपूरच्या आशा कायम

आयएसएल २०२०-२१ : एटीके मोहन बागानचा ब्लास्टर्सवर पिछाडीवरून विजय

आयएसएल २०२०-२१ : नॉर्थईस्ट युनायटेडचा मुंबई सिटीला पुन्हा धक्का

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---