गोवा: माजी विजेत्या बंगलोर एफसीने इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) यंदाच्या पर्वाचा विजयाने निरोप घेतला. कर्णधार सुनील छेत्रीच्या एकमेव गोलच्या जोरावर त्यांनी एससी ईस्ट बंगालवर १-० असा विजय मिळवला. या विजयानंतर बंगलोर एफसी २९ गुणांसह ६व्या स्थानावर राहिले, तर ईस्ट बंगाल ११ गुणांसह गुणतालिकेत तळावर राहिले. सुनील छेत्रीने २४व्या मिनिटाला केलेला गोल निर्णायक ठरला. बंगलोर एफसीचा गोलरक्षक लारा शर्मा या सामन्याचा नायक ठरला.
२२व्या मिनिटाला अँटोनियो पेरोसेव्हिचला वन ऑन वन प्रयत्नात बंगलोर एफसीच्या गोलरक्षकाला चकवायचे होते. पण, गोलरक्षक लारा शर्मा पुढे आला अन् पेरोसेव्हिचला त्वरित हिट करण्यास भाग पाडले. त्यामुळे पेरोसेव्हिचला घाई करावी लागली आणि त्यात त्याचा प्रयत्न चुकला. २४व्या मिनिटाला सुनील छेत्रीने अप्रतिम गोल करून बंगलोरला १-० अशी आघाडी मिळवून दिली. ३०व्या मिनिटाला बंगलोरची ही आघाडी दुप्पट झाली असती, परंतु उदांता सिंगचा प्रयत्न क्रॉस बारला लागून अयशस्वी ठरला. उदांताने बॉक्स बाहेरून हा प्रयत्न केला होता आणि त्याने गोलरक्षकाला चकवलेच होते, परंतु क्रॉस बार आडवा आला.
४१व्या मिनिटाला पेरोसेव्हिच बरोबरीचा गोल करण्याच्या अगदी जवळ आला होता, परंतु चेंडूसोबत अधिक काळ खेळत राहिल्याने बंगलोरच्या बचावपटूंना त्याला रोखण्याची संधी मिळाली. पेरोसेव्हिच मध्य रेषेपासून चेंडू ६ यार्ड बॉक्सपर्यंत सुरेखरित्या घेऊन गेला, परंतु ना त्याने चेंडूला सहकाऱ्याकडे सोपवले ना वेगाने गोलजाळीच्या दिशेने पाठवले. रोशन नाओरेमने त्याला ब्लॉक केले आणि एससी ईस्ट बंगालने बरोबरीची संधी गमावली. या प्रयत्नात पेरोसेव्हिच दुखापतग्रस्त झाला आणि त्याला मैदान सोडावे लागले. ईस्ट बंगालसाठी हा दुसरा मोठा धक्का ठरला. ईस्ट बंगालने गोल करण्याच्या अनेक संधी तयार केल्या, परंतु त्यांना गोल करता आला नाही.
मध्यंतरानंतर ईस्ट बंगालकडून पुन्हा सातत्याने प्रयत्न होताना दिसले, परंतु बंगलोरची बचावफळी त्यांना यश मिळवू देत नव्हती. ५४व्या मिनिटाला नाओरेम सिंगकडून प्रयत्न झाला, परंतु चेंडू थेट गोलरक्षकाच्या हातात विसावला.
महत्त्वाच्या बातम्या-
आयएसएल: जमशेदपूर एफसीचा दणदणीत विजय, ओदिशा एफसीने पराभवाने घेतला निरोप
युद्धाच्या रणांगणातून क्रीडाविश्वासाठी वाईट खबर; दोन युवा फुटबॉलपटूंचा रशियाच्या हल्ल्यात मृत्यू
मोहन बागानचीही ‘प्ले-ऑफ’मध्ये धडक; चेन्नईयनवर निसटता विजय