MPL 2025: महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल 2025) ची सुरुवात काही दिवसांमध्येच होणार आहे. हा स्पर्धेचा तिसरा हंगाम असेल. तिसऱ्या हंगामात प्रवेश करण्यापूर्वी आपण मागील दोन हंगामातील सर्वोत्कृष्ट कामगिरीचा आढावा घेत आहोत. आज आपण एमपीएल 2024 मध्ये टाकल्या गेलेल्या सर्वोत्तम गोलंदाजी स्पेलविषयी जाणून घेणार आहोत.
एमपीएल 2024 मध्ये रत्नागिरी जेट्सचा अनुभवी फिरकीपटू सत्यजित बच्छाव (Satyajit Bachhav) याने आपल्या फिरकीने भल्याभल्या फलंदाजांना जखडून ठेवले. त्याने दोन वेळा चार बळी तर एकदा पाच बळी घेण्याचा कारनामा केला. स्पर्धेतील 20 व्या सामन्यात 139 धावांचा बचाव करताना रत्नागिरी संघाला विजय मिळवून देण्यात त्याने मोठा वाटा उचलला. त्याने केवळ 17 धावा देत पाच फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. हे हंगामातील सर्वोत्तम गोलंदाजी पृथ्थकरण राहिले.
सत्यजित बच्छाव याने एमपीएल 2024 मधील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करण्याच्या एक सामन्याआधीच पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाच्या श्रेयस चव्हाण (Shreyas Chavan) याने स्पर्धेतील पहिले पंचक मिळवले होते. ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वातील पुणेरी बाप्पा संघाला केवळ 135 धावांमध्ये रोखण्यात कोल्हापूरला यश आले होते. यामध्ये श्रेयसने 18 धावा देऊन 5 फलंदाजांना बाद केलेले.
एमपीएल 2024 मध्ये 28 वा सामना पुणेरी बाप्पा व छत्रपती संभाजी किंग्स यांच्या दरम्यान खेळला गेला. या सामन्यात पुणे संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज सचिन भोसले (Sachin Bhosale) चमकला. सचिनने या सामन्यात केवळ तीन षटके गोलंदाजी केली. मात्र, या तीन षटकात त्याने फक्त नऊ धावा देत चार धावांना पव्हेलियनमध्ये धाडले. सचिन याने एमपीएल 2023 मध्ये सर्वाधिक बळी मिळवत पर्पल कॅप जिंकली होती.
पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघासाठी अथर्व डाकवे (Atharva Dakve) हा गेम चेंजर ठरला होता. स्पर्धेत उशिरा संधी मिळाल्यानंतरही त्याने आपली दखल घ्यायला भाग पाडले. छत्रपती संभाजी किंग्सविरुद्ध त्याने आपल्या चार षटकात फक्त 10 धावा देऊन चार फलंदाजांना बाद केले. त्याचा हाज्ञस्पेल स्पर्धेतील चौथा सर्वोत्तम स्पेल ठरला.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आ. रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी देखील संपूर्ण स्पर्धा प्रेक्षकांसाठी विनामूल्य असेल. तसेच चाहते प्रथमच आयोजित होत असलेल्या WMPL ची देखील मेजवानी घेऊ शकतात. गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर या दोन्ही स्पर्धा होतील. या स्पर्धा JioHotstar व Star Sports 2 येथे थेट प्रक्षेपित होणार आहेत. (MPL 2025 Live Telecast On JioHotstar OTT And Star Sports 2 Tv Channel)






