इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेला ९ एप्रिलपासून सुरुवात झाली होती. तेव्हापासून क्रिकेट चाहत्यांना चौकार आणि षटकारांचा पाऊस, अप्रतिम झेल व फलंदाजांच्या उडत्या दांड्या पाहायला मिळत होत्या. या स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पाहायला मिळाले.
सोमवारी (३ मे) कोलकाता नाईट रायडर्स संघातील २ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर मंगळवारी (४ मे) सनरायझर्स हैदराबाद संघाचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान सहा देखील कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे बीसीसीआय आणि आयपीएलच्या कमिटीने स्पर्धा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत अनेक असे खेळाडू होते. ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत आयपीएलप्रेमींची मने जिंकली. त्याच खेळाडूंच्या कामगिरीवर एक नजर टाकूयात…
१) रवींद्र जडेजा : चेन्नई सुपर किंग्ज संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध खेळलेली खेळी कोणीच विसरू शकणार नाही. चांगल्या फॉर्ममध्ये असलेला गोलंदाज हर्षल पटेलला त्याने डावाच्या शेवटच्या षटकात तब्बल ३७ धावा कुटल्या होत्या. याच सामन्यात त्याने ३ गडी देखील बाद केले होते. एवढेच नव्हे तर, आयपीएल सामन्यांदरम्यान त्याच्या नेत्रदिपक क्षेत्ररक्षणानेही क्रिकेट चाहत्यांना प्रेमात पाडले होते.
२) हर्षल पटेल : आयपीएल २०२१ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने हर्षल पटेलला आपल्या संघात खेळण्याची संधी दिली होती. या संधीचे सोने करत त्याने बेंगलोर संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. त्याने अवघ्या ७ सामन्यात १७ गडी बाद केले होते. तसेच तो पर्पल कॅपचा देखील मानकरी ठरला आहे.
३) कायरन पोलार्ड : मुंबई इंडियन्स संघाचा विस्फोटक अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्ड हा लांब लांब षटकार मारण्यासाठी ओळखला जातो. त्याने चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात हे सिद्ध करून दाखवले होते की, त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विस्फोटक फलंदाज का म्हणतात. त्याने चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात गोलंदाजी करताना २ गडी बाद केले होते. यासोबतच फलंदाजी करताना त्याने अवघ्या ३४ चेंडूत ८७ धावांची खेळी केली होती.
४) शिखर धवन : दिल्ली कॅपिटल्स संघाचा सलामीचा फलंदाज शिखर धवन यंदा चांगल्याच फॉर्ममध्ये होता. त्याने या हंगामात सर्वाधिक ३८० धावा केल्या. ऑरेंज कॅपसह त्याने या हंगामात सर्वाधिक ४३ चौकार देखील लगावले होते. शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांच्या जोडीने दिल्ली कॅपिटल्स संघाला चांगली सुरुवात करून दिली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
‘खास जोडीदाराकडून खास भेट’; मायदेशी परतण्यापूर्वी बटलरने जयस्वालला दिली भेटवस्तू






