जगातील सर्वात मोठी टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पुढील हंगामाची लगबग सुरू झाली आहे. स्पर्धेतील जुन्या आठ संघानी आपले खेळाडू रिटेन केले आहेत. तर, अहमदाबाद व लखनऊ या दोन नव्या फ्रॅंचाईजी देखील आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये सहभागी होतील. तसेच, या नव्या हंगामासाठी खेळाडूंचा मेगा लिलाव होणार आहे. त्याचवेळी, सर्व संघांनी अनेक दिग्गजांना आपले प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय संघाचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण (Bharat Arun) यांनीदेखील नव्या संघाशी करार केला आहे.
या संघाशी जोडले गेले अरुण
भारतीय संघासह अनेक वर्ष काम केल्यानंतर भरत अरुण यांनी मागील वर्षी टी२० विश्वचषकानंतर आपले गोलंदाजी प्रशिक्षकपद सोडले होते. त्यानंतर ते नवी आयपीएल फ्रॅंचाईजी अहमदाबादचे प्रशिक्षक होणार अशा बातम्या समोर आलेल्या. मात्र, त्यांनी आता दुसऱ्या संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. दोन वेळा आयपीएल विजेता राहिलेल्या कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाने त्यांना आपले गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. केकेआरने ट्विट करत याबाबतची माहिती दिली. (KKR New Bowling Coach)
प्रशिक्षक पदाचा भरपूर अनुभव
भरत अरुण यांच्याकडे प्रशिक्षक पदाचा मोठा अनुभव आहे. चार वनडे व दोन कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच प्रशिक्षक म्हणून त्यांच्या गाठीशी मोठा अनुभव आहे. २०१७ मध्ये रवी शास्त्री (Ravi Shastri) यांची भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपदी निवड केल्यानंतर अरुण यांच्याकडे गोलंदाजी प्रशिक्षकपद दिले गेले होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली भारतीय संघाचे अनेक उत्कृष्ट वेगवान गोलंदाज तयार झाले. २०२१ टी२० विश्वचषकानंतर शास्त्री व आर श्रीधर यांच्यासह अरुण यांनी भारतीय संघाचे प्रशिक्षकपद सोडले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
विराटच्या ‘त्या’ वर्तनावर भडकला गंभीर! ‘…तुम्ही कधीच रोल मॉडेल बनू शकत नाही’ (mahasports.in)
रमीज राजांनी सुचवलेली ‘ती’ मालिका होणार का? आयसीसी म्हणते… (mahasports.in)