गांवदेवी क्रीडा व युवक मंडळ भातसई यांचा मंडळाचा सुवर्ण महोस्तवी वर्ष असून कै. शांताराम मा. कोतवाल क्रीडा नगरीत सुरू असलेल्या राज्यस्तरीय व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत काल दुसऱ्यादिवशी साखळी फेरीचे सामने झाले. भारत पेट्रोलियम, एयर इंडिया, जेएसडब्लू, महाराष्ट्र पोलीस, मुंबई बंदर, महिंद्रा अँड महिंद्रा संघाचा बादफेरीत प्रवेश मिळवला.
भारत पेट्रोलियम विरुद्ध सेन्ट्रल बँक यांच्यात झालेल्या सामना भारत पेट्रोलियम संघाने ३३-१४ अशी सहज विजय मिळवला. भारत पेट्रोलियम हा प्रो कबड्डीतील स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या संघ आहे. चढाईत अजिंक्य कापरे व नितीन मदने यांनी चांगला खेळ केला. तर पकडीत निलेश शिंदेने चांगल्या पकडी केल्या.
सेन्ट्रल रेल्वे विरुद्ध महाराष्ट्र पोलीस यांच्यात अटीतटी लढत बघायला मिळाली. मध्यंतरापर्यत महाराष्ट्र पोलीस संघाने एक लोन टाकत १७-११ अशी आघाडी मिळवली होती. त्यानंतर रेल्वेने आक्रमक खेळ करत महाराष्ट्र संघावर लोन टाकत शेवटच्या पाच मिनिटंपूर्वी २४-२३ अशी आघाडी मिळवली. महाराष्ट्र पोलीस कडून वैभव कदम, विपुल मोकल तर रेल्वे कडून सूरज बनसोडे, अमीर धुमाळ यांनी उत्कृष्ट खेळ केला. सामना २८-२८ असा बरोबरीत राहिला.
महिंद्रा अँड महिंद्रा विरुद्ध चव्हाण उद्योग यांच्यात झालेल्या ड गटातील लढतीत महिंद्रा संघाने ४९-२१ असा सहज विजय मिळवला. महाराष्ट्र संघात खेळल्या अजिंक्य पवारने उत्कृष्ट खेळ करत विजयात मोलाची भूमिका बजावली. रायगड पोलीस विरुद्ध रिझर्व्ह बँक यांच्यात झालेल्या चुरशीच्या सामन्यात रायगड पोलीस संघाने ३५-३० असा विजय मिळवला.
सेंट्रल रेल्वे विरुद्ध मुंबई बंदर यांच्यात कडवी लढत झाली. रेल्वेसाठी हा सामना महत्वपूर्ण होता. मध्यंतरापर्यत १२-१० अशी आघाडी मुंबई बंदर संघाकडे होती. मुंबई बंदर कडून शुभम कुंभार, स्मितील पाटील, मनोज बद्रे यांनी चांगला खेळ करत ३०-२९ असा विजय मिळवला. रेल्वेकडून अमीर धुमाळने चांगला खेळ केला. या पराभवमुळे रेल्वेचे आव्हान संपुष्टात आले.
साखळीतील ५ सामने शिल्लक असलेल्या मुळे आज कोणता संघ कोणा विरुद्ध उपांत्यपूर्व सामना खेळणार हे चित्र स्पष्ट झाले नाही. उरलेल्या पाच सामन्यानंतर उपांत्यपूर्व फेरीचे सामने ठरतील.