आपल्या भेदक गोलंदाजीने अनेक दिग्गज फलंदाजांची बोलती बंद करणारा गोलंदाज म्हणजे भुवनेश्वर कुमार. ९ वर्षांच्या कारकिर्दीनंतर अजूनही त्याच्या गोलंदाजीला तीच धार आहे, जी २०१२ मध्ये त्याने पदार्पण केल्यावेळी होती. असे असतानाही आगामी विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना व इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याची निवड करण्यात आली नाही. भारतीय संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयानंतर अनेक क्रिकेट चाहते आश्चर्यचकित आहेत.
इंग्लंडच्या खेळपट्ट्या भुवनेश्वरसाठी खूप अनुकूल आणि मदतशीर आहेत. त्याने यापुर्वीही हे सिद्ध करुन दाखवले आहे. परंतु इंग्लंडच्या दीर्घ दौऱ्यावर त्याची निवड न करणे म्हणजे त्याच्या कसोटी कारकिर्दीचा अंत असल्याचा इशारा दिसून येत आहे. या लेखात आम्ही भुवनेश्वरला इंग्लंड दौर्यावर समावेश न करण्यामागच्या कारणांचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे.
चार कारणे ज्यामुळे भुवनेश्वर कुमारची नाही झाली इंग्लंड दौऱ्यावर निवड
१. भुवनेश्वरला सतत होणारी दुखापत ही एक मोठी समस्या
भुवनेश्वरने २०१८ मध्ये झालेल्या दुखापतीनंतर लाल चेंडू क्रिकेट खेळलेले नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या कसोटी मालिकेतही त्याला ५ गोलंदाजांसोबत ठेवले गेले होते. निवडकर्त्यांच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न केला तर, भुवनेश्वर हा पांढर्या चेंडूने मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळत आहे. परंतु गेल्या तीन वर्षात भुवनेश्वरने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये भाग का घेतला नाही? ही खरोखर धक्कादायक बाब आहे. कारण तो भारताच्या मुख्य गोलंदाजांपैकी एक आहे. भुवनेश्वरला बर्याच वर्षांपासून सतत दुखापतींचा सामना करावा लागत आहे. कदाचित यामुळेच त्याच्या शरीरावर परिणाम होऊ नये म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तो कसोटी क्रिकेटपासून दूर राहिला आहे.
२. निवडकर्त्यांच्या नजरेतून सतत दूर
२०१९ च्या विश्वचषकानंतर भारतीय संघाने वेस्ट इंडीजचा दौरा केला. तिथे भुवनेश्वर कुमारला वनडे आणि टी-२० स्वरूपात स्थान देण्यात आले. परंतु त्याला कसोटी क्रिकेटपासून दूर ठेवले गेले. त्यानंतर दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेतही तो खेळला. परंतु त्याला कसोटी संघात समाविष्ट केले गेले नाही. याचा अर्थ भुवी यापुढे कसोटी स्वरुपासाठी पसंतीची निवड नाही, हे निवडकांनी ठरवल्यासारखे दिसत आहे.
३. उत्तर प्रदेशसाठी रणजी न खेळणे
भुवनेश्वर कुमारला भारतीय कसोटी संघात पुनरागमन करण्यासाठी रणजी क्रिकेट खेळणे खूप महत्वाचे होते. परंतु हे शक्य झाले नाही. दुखापतीमुळे भुवनेश्वरला २ वर्ष रणजी खेळता आले नाही. रणजी सामने हे २०२०-२०२१ मध्ये कोरोनामुळे खेळवण्यात आले नाहीत. त्यामुळे भुवनेश्वरला त्याला सिद्ध करण्याची संधी मिळालीच नाही. जर त्याने रणजी ट्रॉफीच्या मागील काही हंगामाता शानदार प्रदर्शन केले असते तर, इंग्लंड कसोटी दौर्यासाठी त्याला संघात स्थान देण्यात आले असते. परंतु निवड समितीला भुवीला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील कामगिरीच्या जोरावर संघात सहभागी करता आले नाही.
४. इशांत- जसप्रीत-शमी या तिकडीचे शानदार प्रदर्शन
भुवनेश्वर कुमार हा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील अपवादात्मक गोलंदाज आहे, हे निवड समितीला चांगलेच ठाऊक आहे. परंतु काही परिस्थितीमुळे भुवनेश्वरची कसोटी कारकीर्द शेवटच्या मार्गावर आहे. याचे मुख्य कारण म्हणजे फक्त दुखापत नव्हे तर भारतीय कसोटी संघातील वेगवान गोलंदाजांची तिकडीही आहे. इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीच्या चांगल्या प्रदर्शनामुळे भारतीय कसोटी संघाला भुवनेश्वरची उणीव जाणवत नाही. या ३ खेळाडूंचा बॅकअप म्हणून उमेश यादवला संधी देण्यात आली आहे. यामुळे भुवनेश्वरची कसोटी कारकिर्द संपण्याच्या मार्गावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
लॉर्ड्स कसोटीवर न्यूझीलंडची पकड, कॉनवेच्या ऐतिहासिक द्विशतकानंतर गोलंदाजांची शानदार कामगिरी
कसोटी पदार्पणात द्विशतक करत कॉनवे आला ‘या’ फ्रँचायझीच्या नजरेत, गाजवणार आयपीएलचं मैदान?
धोनीने निवृत्ती घेतल्यानंतर ‘असे’ होते सीएसके संघातील वातावरण, ऋतुराजने केला खुलासा