भारतात कोरोनाने गेल्या दीड वर्षापासून विळखा घातला आहे. याचा फटका सामन्यमाणसापासून ते मोठमोठ्या सेलिब्रेटींपर्यंत सर्वांनाच बसला आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार देखील सध्या या संकटाचा सामना करत आहे. त्याच्या समोरील हे संकट कमी होताना दिसत नाहीये. कारण आता त्याच्या स्वत:मध्ये कोरोनाची लक्षणे आढळत आहेत.
भुवनेश्वर कुमारच्या कुटुंबाला यापूर्वीच मोठे धक्के बसले आहेत. काहीदिवसांपूर्वीच त्याला त्याच्या वडीलांना कर्करोगामुळे गमवावे लागले होते. तसेच त्याची आई देखील कोरोना पॉझिटिव्ह असून हॉस्पिटलमध्ये आहे. आता भुवनेश्वर आणि त्याची पत्नी नुपूर यांनाही कोरोनाची लक्षणे जाणवत आहेत. त्यांनी टाटणी केली असून त्याचे रिपोर्ट्स येणे बाकी आहे. सध्या हे दोघेही मेरठमध्ये त्यांच्या घरी क्वारंटाईन आहेत.
भुवनेश्वर पॉझिटिव्ह आढळल्यास भारतीय संघाला धक्का
जर भुवनेश्वर कुमारचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्याच्या पुढील योजनांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. भारतीय संघाला पुढील महिन्यात मर्यादीत षटकांच्या मालिकांसाठी श्रीलंका दौऱ्यावर जायचे आहे.
या दौऱ्यावर विराट कोहली, रोहित शर्मा अशा कसोटी संघात असणाऱ्या दिग्गजांचा समावेश नसणार आहे. कारण भारताचा कसोटी संघ त्यावेळी इंग्लंडमध्ये असणार आहे. त्याचमुळे श्रीलंका दौऱ्यासाठी अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. याबरोबरच विराट, रोहितच्या अनुपस्थितीत एखाद्या अनुभवी खेळाडूकडे नेतृत्वपद येऊ शकते. या नेतृत्वपदाच्या शर्यतीत भुवनेश्वर कुमार देखील आहे. पण जर त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्याच्या या दौऱ्यावर जाण्याच्या मार्गात अडथळा होऊ शकतो.
इंग्लंड दौऱ्यासाठी भुवनेश्वरची निवड नाही
भारतीय संघ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना आणि इंग्लंड विरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या दौऱ्यासाठी काहीदिवसांपूर्वीच भारतीय संघाची घोषणा झाली असून भुवनेश्वर कुमारला या संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्याची निवड न झाल्याने बरीच चर्चाही क्रिकेट वर्तुळात रंगली होती.
भुवनेश्वर कुमारची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
साल २०१२ ला भारतीय संघातून पदार्पण करणाऱ्या भुवनेश्वरने त्याच्या कारकिर्दीत २१ कसोटी सामने, ११७ वनडे आणि ४८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत ६३, वनडेत १३८ आणि आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये ४५ विकेट्स घेतल्या आहेत. मागील काही काळापासून तो सातत्याने दुखापतीमुळे भारतीय संघात आत-बाहेर राहिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
गोष्ट एका क्रिकेटरची भाग १७: धोनी आधी पदार्पण करुनही १४ वर्षांचा वनवास पाहिलेला दिनेश कार्तिक
क्रिकेटपटू विरुद्ध निवड समिती! ५ असे प्रसंग, जेव्हा खेळाडूंनी बोर्डावर केली खुली टीका
केकेआरला तिसऱ्या जेतेपदाची आस, मॉर्गनच्या अनुपस्थित ‘हे’ खेळाडू बनू शकतात नवे कर्णधार