मँचेस्टर। 2019 आयसीसी क्रिकेट विश्वचषकात रविवारी(16 जून) भारत विरुद्ध पाकिस्तान संघात 22 वा सामना ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने 89 धावांनी विजय मिळवला. हा भारताचा या विश्वचषकातील तिसरा विजय ठरला आहे.
परंतू भारताने हा विजय मिळवला असला तरी त्यांना या सामन्यात एक मोठा धक्का बसला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे तो जास्तीत जास्त तीन सामन्यातून बाहेर पडला आहे. त्याच्या दुखापतीबद्दल भारताचा कर्णधार विराट कोहलीने हा सामना संपल्यानंतर माहिती दिली आहे.
विराट सामना संपल्यानंतर म्हणाला, ‘भूवीची दुखापत छोटी आहे. तो घसरल्याने ही दुखापत झाली. सध्यातरी ती खूप गंभीर वाटत नाही. तसेच आत्तातरी वाटत आहे की पुढील काही सामन्यांपर्यंत तो बरा होईल. जास्तीत जास्त तीन सामन्यांपर्यंत.’
‘तो आमच्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे तो वेळेत बरा होईल अशी आशा आहे. पण आमच्याकडे शमी आहे. आम्हाला जास्त काळजी करण्याची गरज नाही. भूवी देखील त्याची दुखापत गंभीर नसल्याचा विचार करत आहे.’
या सामन्यात भारतीय संघ 336 धावांचे रक्षण करत असताना भुवनेश्वरला त्याचे तिसरे षटक टाकताना हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली. त्यामुळे तो त्याच्या तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू टाकल्यानंतर गोलंदाजी थांबवून मैदानाबाहेर गेला. त्यानंतर माहिती देण्यात आली की तो उर्वरित सामन्यातून बाहेर पडला आहे.
त्याचे षटक अष्टपैलू क्रिकेटपटू विजय शंकरने पूर्ण केले. विशेष म्हणजे विजय शंकरने हे षटक पूर्ण करताना पहिल्याच चेंडूवर इमाम उल हकला बाद केले आणि भारताला पहिले यश मिळवून दिले.
या सामन्यात पाकिस्तान संघ 35 षटकात 6 बाद 166 धावांवर असताना पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे पाऊस थांबल्यानंतर पाकिस्तानचा डाव डकवर्थ लूईस नियमानुसार 40 षटकांचा करण्यात आला. तसेच पाकिस्तानसमोर 302 धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते.
त्यानुसार पाकिस्तान पावसाच्या व्यत्ययानंतर फलंदाजीला उतरल्यावर त्यांच्यासमोर 5 षटकात 136 धावांचे अशक्यप्राय आव्हान होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला 40 षटकात 6 बाद 212 धावाच करता आल्या. भारताकडून विजय शंकर, कुलदीप यादव आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
तत्पूर्वी या सामन्यात भारताकडून रोहित शर्माने 140 धावांची शतकी खेळी केली. त्याचबरोबर केएल राहुलने 57 आणि विराट कोहलीने 77 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे भारताला 50 षटकात 5 बाद 336 धावांचा डोंगर उभा करता आला. तसेच पाकिस्तानकडून मोहम्मद अमिरने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विश्वचषक २०१९: भारताचा पाकिस्तानवर ८९ धावांनी दणदणीत विजय
–भारतीय संघाला जोरदार धक्का; हा खेळाडू पडला उर्वरित सामन्यातून बाहेर
–टॉप १०: हिटमॅन रोहित शर्माने शतकी खेळीबरोबरच केले हे खास १० विक्रम