भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार सध्या श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या युवा संघाचा उपकर्णधार आहे. भुवनेश्वर मागील काही काळापासून केवळ मर्यादित षटकांच्या मालिकांमध्ये खेळतो. भुवनेश्वर कसोटी क्रिकेटमध्ये कधी पुनरागमन करणार याची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. त्याच वेळी आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका वरिष्ठ सदस्याने याबाबत महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे.
कसोटी संघातून बाहेर आहे भुवनेश्वर
भारतीय क्रिकेट संघात मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी पहिल्या पसंतीचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार २०१८ पासून कसोटी संघात सामील नाही. त्याने आपला अखेरचा कसोटी सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. त्यानंतर दुखापतीमुळे संघ व्यवस्थापन त्याला कसोटीमध्ये खेळवू इच्छित नसल्याचे तसेच स्वतः भुवनेश्वर कुमार कसोटी खेळण्यासाठी इच्छुक नसल्याची अफवा पसरली होती. मात्र, स्वतः भुवनेश्वरने यावर प्रतिक्रिया देत आपण कसोटीमध्ये पुनरागमन करणार असल्याचे म्हटलेले.
तेव्हा भुवनेश्वर खेळणार कसोटी
भुवनेश्वर कुमार कसोटी क्रिकेटमध्ये केव्हा पुनरागमन करणार याबाबत विचारले असता, बीसीसीआयच्या एका अधिकार्याने नाव न सांगण्याच्या अटीवर म्हटले, “भुवनेश्वर कुमार याला कसोटी संघामध्ये आणण्याची कसलीही घाई नाही. भारतीय संघाला यानंतर टी२० विश्वचषकासारखी महत्वपूर्ण स्पर्धा खेळायची आहे. तत्पूर्वी भुवनेश्वर कसोटी संघात खेळताना दिसणार नाही. याबाबत भुवनेश्वरशी चर्चा झाली असून त्याने याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्याला अचानकपणे कसोटी सामन्यात उतरविल्यास दुखापती होऊ शकतात. हा सर्व विचार करूनच भुवनेश्वरला कसोटी खेळण्यापासून रोखले जात आहे.”
इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघात भुवनेश्वरला सामील करावे अशी मागणी अनेक चाहते सोशल मीडियावर करत होते.
अशी राहिली आहे कारकीर्द
भुवनेश्वर कुमार याची आतापर्यंतची कसोटी कारकीर्द २१ सामन्यांची राहिली आहे. या २१ सामन्यांमध्ये २६.०९ च्या सरासरीने त्याने ६३ बळी आपल्या नावे केले आहेत. तसेच, ११९ वनडेमध्ये १४१ व ४९ टी२० मध्ये ४९ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आहे. तो आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व करतो.
महत्त्वाच्या बातम्या –
याद आ रही है! जड्डूला येतेय लाडक्या पत्नीची आठवण; सोशल मीडियावर व्यक्त केले दु:ख
‘क्यूटेस्ट रेनबो’; रिषभ पंतच्या ‘या’ गोष्टीवर गर्लफ्रेंडचं आलं मन, दिली प्रेमळ प्रतिक्रिया
“हसरंगा आयपीएलमध्ये खेळताना दिसेल”, दिग्गजाने व्यक्त केला आशावाद