आयपीएलचा तेरावा हंगाम नुकताच संपला. आता क्रिकेटप्रेमींना आयपीएलपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक प्रसिद्ध टी२० लीग असलेल्या बिग बॅशची आतुरता लागली आहे. ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळत असतो. बिग बॅशचा दहावा हंगाम १० डिसेंबर पासून सुरू होणार आहे. त्याच निमित्ताने, स्पर्धेला रोमांचक बनवण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने क्रिकेटच्या पारंपारिक नियमांमध्ये काही नवीन नियम समाविष्ट केले आहेत.
टी२० क्रिकेटची लोकप्रियता पाहता बिग बॅश लीग अधिक रोमांचक आणि स्पर्धात्मक बनवण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने तीन नवीन नियम बनवले आहेत. हे नियम यापूर्वी कधीही ही वापरले गेले नव्हते.
बिग बॅश २०२०-२०२१ मध्ये वापरण्यात येणारे नवीन नियम-
एक्स फॅक्टर
दोन्ही संघांना दहाव्या षटकानंतर ‘एक्स फॅक्टर’ खेळाडूचा उपयोग करण्याची परवानगी मिळेल. हा खेळाडू फलंदाजी करणाऱ्या संघात एका फलंदाजाची आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघात एका गोलंदाजाची जागा घेईल. हा ‘एक्स फॅक्टर’ खेळाडू फक्त त्याच खेळाडूची जागा घेईल. ज्याने एका षटकाहून अधिक फलंदाजी किंवा गोलंदाजी केली नसेल. क्रिकेटच्या पारंपारिक नियमानुसार, फक्त क्षेत्ररक्षकाच्या जागी बदली क्षेत्ररक्षक खेळवण्याची परवानगी आहे. हा बदली क्षेत्ररक्षक फलंदाजी किंवा गोलंदाजी करू शकत नाही. या ‘एक्स फॅक्टर’ नियमामुळे अगदी काही चेंडूत सामन्याचा नूर पलटू शकतो.
पावर सर्ज
बिग बॅश लीगमध्ये वापरण्यात येणारा दुसरा नियम ‘पावर सर्ज’ या नावाने ओळखला जाईल. हा पावर सर्ज म्हणजे दोन षटकांचा छोटा पावरप्ले असेल. फलंदाजी करणाऱ्या संघाला अखेरच्या दहा षटकात कधीही या दोन षटकांच्या पावर सर्जचा वापर करता येऊ शकतो. या पावर सर्जवेळी ३० यार्डाबाहेर फक्त दोन क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षण करू शकतात. पावर सर्जमुळे पारंपारिकरीत्या, डावाच्या सुरुवातीला दिला जाणारा पावरप्ले चार षटकांचा करण्यात आला आहे.
बॅश बूस्ट
बिग बॅश लीग दरम्यान वापरण्यात येणारा तिसरा नवीन नियम गुणतालिकेशी निगडीत आहे. ज्याला ‘बॅश बूस्ट’ असे नाव दिले गेले आहे. दोन्ही संघांच्या पहिल्या दहा षटकांमध्ये ज्या संघाने सर्वाधिक धावा काढल्या असतील, त्या संघाला एक बोनस गुण देण्यात येणार आहे.
नव्या नियमांनी अधिक धावा बनवण्यासाठी संघ प्रयत्न करतील
बिग बॅश लीगचे प्रमुख ऍलिस्टर डॉबसन हे या नवीन नियमांविषयी माहिती देताना म्हटले, “नव्या नियमांमुळे संघ अधिक धावा बनवण्यासाठी प्रयत्न करतील. क्रिकेट रोमांचक होईल. नवनव्या रणनित्या आखल्या जातील. खेळातील चुरस संपूर्ण सामन्यादरम्यान टिकून राहील. आम्हाला विश्वास आहे की, या नव्या नियमांना प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल.”
बिग बॅश लीगचा आगामी हंगाम १० डिसेंबरपासून सुरू होत आहे. होबार्ट हरिकेन्स विरुद्ध सिडनी सिक्सर्स या सामन्याने स्पर्धेला सुरुवात होईल. मेलबर्न रेनगेड्स बिग बॅश लीगचे गतविजेते आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ पठ्ठ्या भारताविरुद्ध कोणत्याही क्रमांकावर खेळण्यास तयार
‘असे’ ठरणार कसोटी चॅम्पियनशीपमधील अव्वल दोन संघ; भारतासाठी वाट कठीण
“विराट जागतिक क्रिकेटमधील सामर्थ्यवान खेळाडू”, ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गजाचे वक्तव्य
ट्रेंडिंग लेख-
‘डेमियन फ्लेमिंग’… पहाट स्वप्न सत्यात उतरलेले पाहिलेला ऑसींचा एकमेव गोलंदाज
‘जिनीयस’ हेमांग बदानीची पुण्यातील ‘ती’ अद्वितीय खेळी
सचिनची ‘ती’ खेळी कधीच विसरली जाणार नाही