भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) दोन्ही संघात तिसरा कसोटी सामना 10 जुलैपासून लॉर्ड्स मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे (Jasprit Bumrah) पुनरागमन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाजांपैकी कोणाला तरी बाहेर जावे लागू शकते. बुमराहच्या जागी आकाश दीप (Aakash Deep) दुसऱ्या कसोटी सामन्यात संघात सामील झाला होता. त्याने शानदार गोलंदाजी केली. दुसरीकडे वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने (Prasiddh Krishna) कामगिरी खूपच निराशाजनक राहिली आहे. त्यामुळे त्याला संघाबाहेर करण्यात येऊ शकते.
पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने सिराज, प्रसिद्ध आणि बुमराह या मुख्य वेगवान गोलंदाजांना संघात घेतले होते. प्रसिद्धकडून चाहत्यांना खूप अपेक्षा होत्या. कारण त्याने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली होती. पण त्याने आपल्या गोलंदाजीने सर्वांना निराश केलं आहे. पहिल्या सामन्यात त्याने काही विकेट्स घेतल्या, पण त्या बदल्यात खूपच जास्त धावा लुटवल्या. दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात त्याला एकही विकेट मिळाली नाही.
प्रसिद्धने पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात 3 विकेट्स घेतल्या होत्या, पण त्याचबरोबर 6.40 च्या इकॉनॉमीने धावा देखील दिल्या. दुसऱ्या डावात त्याने 2 विकेट्स घेतल्या. दुसऱ्या कसोटीमध्येही पहिल्या डावात त्याची परिस्थिती तशीच राहिली. त्याने 5 पेक्षा जास्त इकॉनॉमीने धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही.
लॉर्ड्स कसोटी सामन्यात बुमराहचे पुनरागमन निश्चित मानले जात आहे. अशा परिस्थितीत दुसऱ्या कसोटी सामन्यात दमदार कामगिरी करणाऱ्या आकाश दीपला प्रसिद्धच्या जागी संधी मिळू शकते. आकाशने दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात महत्त्वाच्या 4 विकेट्स घेतल्या. दुसऱ्या डावातही त्याने आतापर्यंत 2 विकेट्स मिळवल्या आहेत. त्यामुळेच प्रसिद्धला संघातून बाहेर करण्यात येऊ शकते.






