टीम इंडियाचा विश्वासू फलंदाज श्रेयस अय्यरच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात अय्यर दुखापतग्रस्त झाला आहे. अहवालानुसार, अय्यरला पूर्णपणे फिट होऊन परतण्यासाठी सुमारे आठ आठवड्यांचा वेळ लागेल. याचा अर्थ असा की तो केवळ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतूनच नव्हे, तर जानेवारीत न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेतूनही बाहेर राहू शकतो.
25 ऑक्टोबरला सिडनीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात श्रेयस अय्यर फील्डिंग करत होता. सामन्यादरम्यान त्याने अॅलेक्स कॅरीचा झेल पकडण्यासाठी डायव्ह मारली, पण त्या वेळी त्याच्या पोटाला गंभीर दुखापत झाली. सुरुवातीला ही दुखापत साधी वाटली, पण नंतर त्याची प्रकृती बिघडत गेली. तत्काळ त्याला सिडनीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तपासणीनंतर डॉक्टरांनी सांगितले की अय्यरला गंभीर (spleen) इजा झाली असून अंतर्गत रक्तस्राव (internal bleeding) झाला आहे.
अहवालांनुसार, श्रेयस अय्यरवर इंटरव्हेन्शनल ट्रान्स-कॅथेटर एम्बोलायझेशन (TCE) नावाची वैद्यकीय प्रक्रिया करण्यात आली. ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये धमन्यांमध्ये एक बारीक ट्यूब टाकून रक्तस्राव थांबवला जातो. ही शस्त्रक्रिया इमेज कंट्रोलच्या मदतीने केली जाते, जेणेकरून शरीराच्या इतर कोणत्याही भागावर परिणाम होऊ नये. डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे आणि तात्काळ उपचारांमुळे सध्या अय्यरची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.
(28 ऑक्टोबर) रोजी बीसीसीआयने श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबत निवेदन जारी करताना म्हटले,
“25 ऑक्टोबरला तिसऱ्या वनडे सामन्यादरम्यान श्रेयस अय्यरच्या पोटाला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्या दुखापतीची तात्काळ ओळख पटवून रक्तस्राव थांबवण्यासाठी उपचार यशस्वीपणे करण्यात आले आहेत. सध्या त्याची प्रकृती सुधारत असून त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.”
बीसीसीआयने हेही स्पष्ट केले की त्यांची वैद्यकीय टीम सिडनी आणि भारतातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या संपर्कात आहे आणि श्रेयसच्या प्रकृती व पुनर्वसन प्रक्रियेवर सतत लक्ष ठेवले जात आहे.






