पाकिस्तान क्रिकेट संघाने शनिवारी (दि. 26 ऑगस्ट) तिसरा वनडे सामना जिंकत अफगाणिस्तानचा सुफडा साफ केला. पाकिस्तानने तिसऱ्या वनडेत 59 धावांनी विजय मिळवला. या विजयामुळे पाकिस्तानने ही मालिका 3-0ने खिशात घातली. पाकिस्तानने पहिल्या सामन्यात 142 धावांनी विजय मिळवला होता, तर दुसऱ्या रोमांचक सामन्यात पाकिस्तानने 1 विकेटने विजय मिळवला होता. आता मालिका विजयानंतर पाकिस्तान वनडे रँकिंगमध्ये अव्वलस्थानी विराजमान झाला.
पाकिस्तानचा विजय
तिसऱ्या वनडे सामन्यात पाकिस्तान संघाने चांगली सुरुवात केली नव्हती. मात्र, मधल्या फळीतील फलंदाजांनी धावांची गती वाढवली आणि 50 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर 268 धावा लावल्या. यामध्ये मोहम्मद रिझवान (67) आणि बाबर आझम (60) यांच्या अर्धशतकांचा समावेश होता. या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचीही सुरुवात खराबच झाली. पाकिस्तानच्या फिरकीपटूंनी अफगाणिस्तानी फलंदाजांना गुडघे टेकायला भाग पाडले. मात्र, मुजीब उर रहमान 26 चेंडूत अर्धशतक झळकावण्यात यशस्वी झाला. त्याने सामन्यात 37 चेंडूत सर्वाधिक 64 धावा केल्या. मात्र, तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. त्यामुळे पाकिस्तानने हा सामना 59 धावांनी जिंकला.
पाकिस्तानने मागील एक वर्षांमध्ये वनडे क्रिकेट प्रकारात आपला दबदबा निर्माण केला आहे. 2022मध्ये त्यांनी मायदेशातील मालिकेत वेस्ट इंडिजचा 3-0ने फडशा पाडला होता. त्यांनी जानेवारी 2023मध्येही न्यूझीलंडविरुद्धची मायदेशातील मालिका 2-1ने नावावर केली होती.
पाकिस्तान एप्रिलमध्ये पुन्हा 5 सामन्यांच्या वनडे मालिकेत न्यूझीलंडशी भिडला. ती मालिकाही पाकिस्तानने 4-1ने जिंकली. आता 3-0ने मालिका जिंकत आयसीसी वनडे रँकिंग (ICC ODI Rankings) गाजवत पहिला क्रमांक पटकावला आहे. आयसीसीने ट्वीट करत याची माहिती दिली आहे.
We have a new No.1 in the @MRFWorldwide ICC Men's ODI Team Rankings 🤩#AFGvPAK pic.twitter.com/VQEZxrSxxH
— ICC (@ICC) August 26, 2023
पाकिस्तान वनडे रँकिंगमध्ये अव्वलस्थानी
अफगाणिस्तान मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलिया संघ 118 गुणांसोबत रँकिंगमध्ये अव्वलस्थानी होता. तसेच, पाकिस्तान 115.8 गुणांसह दुसऱ्या स्थानी होता. मात्र, आता पाकिस्तानचे 118.48 गुण झाले असून त्यांनी अव्वलस्थान पटकावले आहे. तसेच, ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानी घसरला आहे. आता पहिल्या स्थानी पाकिस्तान, दुसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलिया आणि तिसऱ्या स्थानी भारतीय संघ आहे.
तीन दिवसानंतर आशिया चषक
खरं तर, तीन दिवसांनी म्हणजेच 30 ऑगस्टपासून आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध नेपाळ संघात मुल्तान क्रिकेट स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. (big news pakistan become number 1 odi team after whitewash afghanistan 3-0 read)
हेही वाचा-
फलंदाजीमध्ये 99.94ची जबरदस्त सरासरी असलेल्या ‘डॉन’ला इंग्लंडच्या ‘या’ गोलंदाजाने दिलेला सर्वाधिक त्रास
आठ तासांत कसोटीत त्रिशतक करणारे जगातील एकमेव फलंदाज, 46 चौकारांचा दिला गोलंदाजांना प्रसाद