झिम्बाब्वेमधील झिम आफ्रो टी10 2023 स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी (दि. 29 जुलै) हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे येथे पार पडला. हा सामना डर्बन कलंदर्स विरुद्ध जोबर्ग बफेलोज संघात खेळला गेला. महत्त्वाच्या सामन्यात क्रेग इर्विन याच्या नेतृत्वातील डर्बन कलंदर्सचा 8 विकेट्सने विजय झाला. त्यामुळे झिम आफ्रो टी10 स्पर्धेला डर्बन कलंदर्स संघाच्या रूपात पहिला-वहिला चॅम्पियन मिळाला.
या सामन्यात डर्बन कलंदर्स (Durban Qalandars) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय योग्य ठरला. यावेळी फलंदाजीला उतरलेल्या जोबर्ग बफेलोज संघाने निर्धारित 10 षटकात 4 विकेट्स गमावत 127 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना डर्बन संघाने 9.2 षटकातच 2 विकेट्स गमावत 129 धावा केल्या. तसेच, सामना 8 विकेट्सने खिशात घातला.
हजरतुल्लाह जजाईचा राडा
डर्बन संघाकडून फलंदाजी करताना हजरतुल्लाह जजाई चमकला. त्याने 22 चेंडूत नाबाद 43 धावांची झंझावाती खेळी साकारली. या खेळीत त्याने 1 चौकार आणि 4 षटकारांचा पाऊस पाडला. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 195.45 इतका होता. त्याच्याव्यतिरिक्त टीम सेफर्ट याने 30, आंद्रे फ्लेचर याने 29 आणि आसिफ अली याने 21 धावांचे योगदान दिले.
यावेळी जोबर्गकडून गोलंदाजी करताना उस्मान शिनवारी यालाच विकेट घेण्यात यश आले. त्याने 2 षटकात 15 धावा खर्च करत 2 विकेट्स नावावर केल्या.
टॉम बँटनची खेळी व्यर्थ
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना जोबर्ग संघाकडून टॉम बँटन (Tom Banton) याने चमकदार कामगिरी केली. त्याने 17 चेंडूत सर्वाधिक 36 धावा केल्या. ही धावसंख्या उभारताना त्याने 2 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याच्याव्यतिरिक्त कर्णधार मोहम्मद हाफीज (Mohammad Hafeez) याने 13 चेंडूत 32 धावांचे योगदान दिले. तसेच, युसूफ पठाण याने 14 चेंडूत 25 धावा केल्या. यामध्ये 5 चौकारांचा समावेश होता. रवी बोपारा यानेही 10 चेंडूत 22 धावांचे योगदान दिले.
यावेळी डर्बनकडून गोलंदाजी करताना चार गोलंदाजांनी विकेट घेण्यात यश आले. त्या चार गोलंदाजांमध्ये तय्यब अब्बास, जॉर्ज लिंडे, ब्रॅड इव्हान्स आणि अझमतुल्लाह ओमरझाई यांचा समावेश होता. (big news t10 final 2023 hazratullah zazai leads durban qalandars to historic first zim afro t10 title read here)
महत्त्वाच्या बातम्या-
‘याचं मुख्य कारण…’, रोहित आणि विराटला विश्रांती देण्यामागील कारणाचा कोच द्रविडकडून खुलासा
‘Ashes’ इतिहासातील सर्वात मोठा विक्रम Ben Stokesच्या नावावर, 18 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड केला उद्ध्वस्त






