भारतीय क्रिकेटचा दर्जा गेल्या काही वर्षांमध्ये आणखी उंचावला आहे. या संघात स्थान मिळवण्यासाठी कोट्यावधी खेळाडू धडपड करत असतात. आयपीएल स्पर्धेत, देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करून देखील काही खेळाडूंवर लक्ष दिले जात नाही. एक असाच गोलंदाज आहे, ज्याची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील कामगिरी पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. तरीदेखील त्याला भारतीय संघासाठी खेळण्याची संधी मिळाली नाहीये. चला तर पाहूया कोण आहे तो गोलंदाज?
देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत बिहार संघाचे नेतृत्व करणारा आशुतोष अमन याने २०१८ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते. त्याने उत्तराखंड संघाविरुद्ध पदार्पण केले होते. अमनच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने आतापर्यंत अवघे १७ सामने खेळले आहेत. यात त्याला ११७ गडी बाद करण्यात यश आले आहे. यात त्याने १४ वेळेस ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला; तर ६ वेळेस त्याला १० गडी बाद करण्यात यश आले आहे.
गोलंदाजीसह अमन फलंदाज मध्ये देखील तितकाच तरबेज आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या १७ सामन्यात ३८.११ च्या सरासरीने तब्बल ६३१ धावा कुटल्या आहेत. यात १ शतक आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे.
भारतीय संघात संधी मिळण्याची पाहतोय वाट
आशुतोष अमनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली असली तरीही अजुनपर्यंत त्याला भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली नाहीये. या विक्रमी कामगिरीनंतर त्याला भारतीय संघात खेळण्याचा हक्क आहे. परंतु निवडकर्ते सतत त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. अशीच कामगिरी तो येणाऱ्या सामन्यात करत असेल तर त्याला नक्कीच भारतीय संघात खेळण्याची संधी मिळू शकते. कारण प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीमध्ये सातत्य असणे फार गरजेचे आहे. तसेच त्याने अनेक सामने प्लेट ग्रुप संघांसोबत खेळले आहेत. हे देखील एक मुख्य कारण असू शकते की, ज्यामुळे त्याला संधी देण्यात आली नाहीये.
लिस्ट ए आणि टी -२० क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी
अमनने लिस्ट ए क्रिकेट आणि टी२० क्रिकेटमध्ये देखील उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याने लिस्ट ए कारकिर्दीत एकूण २४ सामने खेळले आहेत. यात त्याला ३१.२५ च्या सरासरीने २४ गडी बाद करण्यात यश आले आहे. यासोबतच त्याने ३१५ धावा देखील कुटल्या आहेत. यासोबतच टी-२० कारकिर्दीत त्याने ६.१२ च्या सरासरीने २३ गडी बाद केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
WTC अंतिम सामन्यात ‘ही’ तिकडी करेल न्यूझीलंडची पळता भुई थोडी; नेहराचा टीम इंडियाला गुरुमंत्रट
गोष्ट त्या क्रिकेटरची, ज्याची प्रतिभा अक्षरक्ष: बाळासाहेब ठाकरेंना मैदानावर येण्यास भाग पाडायची
पायात घुसली होती बंदुकीची गोळी तरीही ‘तो’ आज खेळतोय क्रिकेट; विराटसारख्या फलंदाजाला केले होते त्रस्त