भारतीय अंडर-19 संघाचा स्टार खेळाडू वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) सध्या देशासाठी खेळत असल्याने बिहारचा संघ त्याच्याविनाच ‘विजय हजारे ट्रॉफी प्लेट 2025-26’ च्या अंतिम सामन्यात उतरला होता. तरीही बिहारच्या संघाने अप्रतिम खेळ करत मणिपूरचा पराभव केला आणि विजेतेपद पटकावले.
बिहारचा कर्णधार सकीबुल गनीने टॉस जिंकून मणिपूरला फलंदाजीसाठी बोलावले. मणिपूरची सुरुवात बरी झाली होती. उलेन्याई (61 धावा) आणि जोटिन (51 धावा) यांनी अर्धशतके झळकावली, पण इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले. मणिपूरचे 4 फलंदाज शून्यावर बाद झाले. बिहारच्या शब्बीर खानने घातक गोलंदाजी करत केवळ 30 धावांत 7 विकेट्स घेतल्या. हिमांशु तिवारीनेही 3 गडी बाद केले. यामुळे मणिपूरचा संघ 47.5 षटकांत 169 धावांत गारद झाला.
170 धावांचे लक्ष्य बिहारने 31.2 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. यष्टिरक्षक आयुषने 72 चेंडूत 75 धावांची (11 चौकार) मॅचविनिंग खेळी केली. मंगल महरूर (32 धावा) आणि पीयूष सिंह (21 धावा) यांनी चांगली साथ दिली. आकाश राज 20 धावांवर तर बिपिन सौरभ 8 धावांवर नाबाद राहिले.
या विजयामुळे बिहारचा संघ केवळ चॅम्पियन बनला नाही, तर आता त्यांची पदोन्नती झाली आहे. पुढील हंगामात बिहारचा संघ देशातील बलाढ्य ‘एलिट’ (Elite) संघांसोबत खेळताना दिसेल. शब्बीर खानची जबरदस्त गोलंदाजी आणि आयुष लोकारुकाची फलंदाजी यांच्या जोरावर बिहारने प्लेट ग्रुपचे जेतेपद मिळवून इतिहास घडवला आहे.






