आपल्याकडे १७-१८ वर्षाची मुल काय करतात ? असा प्रश्न विचारला गेल्यानंतर सहसा उत्तर मिळते की, मुलं बारावीच्या परीक्षेचा अभ्यास करत असतात. एखादा जण अपवादाने परिस्थितीमुळे नोकरी-धंदा करत असतो. अगदीच कोणी अत्यंत हुशार असेल तर, एखाद्या व्यवसायात यश कमावतो. मात्र, २००३ मध्ये एक १८ वर्षाचा मुलगा भारतासारख्या दिग्गजांचा समावेश असलेल्या संघाकडून क्रिकेटचा विश्वचषक खेळत होता. होय! ज्यावेळी त्या मुलाची भारताच्या संघात विश्वचषकासाठी निवड झाली तेव्हा, त्याचे वय होते १७ वर्ष ३६१ दिवस. हा अठरा वर्षाचा मुलगा होता भारताचा यष्टीरक्षक पार्थिव पटेल.
आज त्याच पार्थिव पटेलचा ३७ वा वाढदिवस. ९ मार्च १९८५ रोजी गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे त्याचा जन्म झाला होता. या खास दिनानिमित्त उजाळा देऊया त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील खास आठवणींना.
‘ती’ जागा मिळवण्यासाठी पार्थिव पुढे आला
भारतीय क्रिकेट संघामध्ये एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला अनेक असे क्रिकेटपटू आले, ज्यांनी भारताच्या एका संतुलित संघात जागा मिळवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. या संघातील सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, विरेंद्र सेहवाग हे फलंदाज प्रतिस्पर्धी गोलंदाजांना घाम फोडण्यास सक्षम होते. दुसरीकडे, जवागल श्रीनाथ व अनिल कुंबळे यांनी गोलंदाजी विभागाची जबाबदारी सांभाळली होती. कर्णधार सौरव गांगुली आणि प्रशिक्षक जॉन राइट हे संघाला एकसंध बांधून होते. संघ मजबूत असला तरी, संघामध्ये युवा खेळाडूंना वारंवार संधी दिली जायची. जहीर खान, हरभजन सिंग, युवराज सिंग, मोहम्मद कैफ या तरण्याबांड पोरांनी वरिष्ठ खेळाडूंच्या खांद्याला खांदा लावून विरोधी संघांना भिडायला सुरुवात केली होती. इतकं सगळं असलं तरी, संघात यष्टीरक्षकाची जागा कोणाची पक्की होत नव्हती. कधी समीर दिघे, कधी अजय रात्रा तर कधी दीप दासगुप्ता यांना संधी दिली जायची. मात्र, ‘हा’ भारताचा प्रमुख यष्टीरक्षक आहे, असे कोणालाच म्हणता येत नव्हते.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये फोडायचा भल्याभल्यांना घाम
अशातच १९९९ पासून भारताच्या १६ वर्षाखालील संघातील एक यष्टीरक्षक सातत्याने चमकदार कामगिरी करत होता. गुजरातकडून खेळणारा हा खेळाडू होता पार्थिव पटेल. पार्थिवचे वय आणि उंची कमी असली तरी तो देशांतर्गत क्रिकेटमधील भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडायचा. त्याला याच कामगिरीमुळे भारताच्या १९ वर्षाखालील संघात समाविष्ट करण्यात आले. तिथेदेखील तो अशीच सातत्यपूर्ण कामगिरी करत राहिला. लवकरच त्याचा समावेश भारताच्या राष्ट्रीय संघात करण्यात आला. त्याला जेव्हा, न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघासोबत जायचे होते, तेव्हा त्याला सोडायला पोलिसांची गाडी आली होती. कारण, त्यावेळी गुजरातमध्ये दंगलींचा माहोल होता. विशेष म्हणजे पार्थिवच्या जन्मावेळी देखील गुजरातमध्ये दंगली सुरू होत्या आणि त्याच्या आजीला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी पोलिसांची व्हॅन वापरलेली.
कसोटी पदार्पण करत मोडला होता मोहम्मद हनीफ यांचा विक्रम
पार्थिवने वयाची १७ वर्ष पूर्ण होण्याआधीच आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून त्याने आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. मात्र, त्याला खरी ओळख मिळाली ती, त्याच्या कसोटी पदार्पणातपासून. भारताचा प्रमुख यष्टीरक्षक अजय रात्रा जखमी झाल्याने पार्थिवला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. त्यावेळी तो खरंतर, भारताच्या एकोणीस वर्षाखालील संघाचा सदस्य होता. परंतु, आणीबाणीची परिस्थिती ओळखून संघ व्यवस्थापनाने त्याला कसोटी खेळण्याची संधी दिली. त्या वेळी त्याचे वय होते अवघे १७ वर्ष १५३ दिवस. आपल्या कसोटी पदार्पणावेळी त्याने चक्क पाकिस्तानचे सर्वकालीन महान फलंदाज मोहम्मद हनीफ यांचा विक्रम मोडत, सर्वात कमी वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा यष्टीरक्षक होण्याचा मान मिळवला. पार्थिवची पावले संघात पडताच भारताला २००२ साली लंडनमध्ये विस्डेन इंडियन क्रिकेटर ऑफ द सेंचुरी पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे त्याला संघाचा शुभंकर असे म्हटले जाऊ लागले.
अठराव्या वर्षी विश्वचषक संघात झाला होता समावेश
भारताकडून सर्वात कमी वयात कसोटी खेळणारा यष्टीरक्षक बनल्यानंतर पार्थिवने पुढील पल्ला गाठला तो म्हणजे विश्वचषकात निवडले जाण्याचा. दक्षिण आफ्रिकेत आयोजित २००३ क्रिकेट विश्वचषकासाठी त्याचा प्रमुख यष्टिरक्षक म्हणून भारतीय संघात समावेश केला गेला. एका अठरा वर्षाच्या मुलाला आभाळ ठेंगणे झाले होते. कारण, ज्या खेळाडूंना पाहून त्यांनी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्यांच्यासोबत, तो विश्वचषकात आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणार होता. दुर्दैवाने, त्याला विश्वचषकात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. भारतीय संघाला एक अतिरिक्त गोलंदाज खेळवता यावा म्हणून, अनुभवी राहुल द्रविडने यष्ट्यांमागील जबाबदारी स्वीकारण्यासाठी हात वर केला होता.
कारकिर्दीच्या सुरुवातीला दाखवल्या बाललीला
ज्या लहान वयात पार्थिवने भारताचे प्रतिनिधित्व केले, त्या वयाला साजेशी कृत्ये पार्थिव कारकिर्दीच्या सुरुवातीला करायचा. त्याच्या पहिल्या कसोटी वेळचे ‘फायर अलार्म’ प्रकरण, एमटीव्ही बकरा प्रॅन्क तसेच ऑस्ट्रेलियन दिग्गज स्टीव वॉविरूद्ध केलेली स्लेजिंग या सगळ्या गोष्टी त्याच्या बाललीला होत्या. पार्थिव हा भारताचा असा एकमेव क्रिकेटपटू बनला, जो वरिष्ठ स्तरावरील आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळून पुन्हा एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक खेळला होता. ‘मोस्ट सिनियर प्लेयर इन जूनियर टीम’ हे कारकिर्दीच्या सुरुवातीला लागलेले पालुपद त्याच्या नावासमोर मागील दोन दशके टिकून आहे.
ज्यावेळी पार्थिवने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले त्यावेळीचा त्याचा चेहरा आणि आज त्याने निवृत्ती घेतल्यानंतर असलेला त्याचा चेहरा यात काहीही तफावत नाही. भारताकडून त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द कशी राहिली? किती राहिली ? यापेक्षा त्याने किती चाहते कमावले ? हे महत्वाचे आहे.
गेली वीस वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेटपटू म्हणून आपली ओळख सांगणारा पार्थिव आज माजी क्रिकेटपटू झाला.
वाचा –
विश्वचषक गाजवणारा परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये छाप न पाडू शकणारा कायरन पॉवेल
च्युइंग गम चावत अन् विना हेल्मेट फलंदाजी करायचे रिचर्ड्स; मैदानावर उतरताच गोलंदाजांना फुटायचा घाम
एकवेळ क्रिकेट सोडण्याच्या विचारात असलेला रॉस टेलर, आता बनलाय सार्वकालिन महान फलंदाज