क्रिकेटमधील सर्वात वेगवान क्रिकेट प्रकार म्हणजे टी२० होय. २० षटकांच्या क्रिकेटमध्ये फलंदाज गोलंदाजांची चांगलीच धुलाई करतात. फलंदाजीला उपयुक्त खेळपट्टी, पावरप्ले आणि याव्यतिरिक्त अनेक अशा गोष्टी असतात, ज्या पूर्णपणे हा खेळ फलंदाजांच्या बाजूने घेऊन जातात. असे असले, तरीही काही गोलंदाज असेही आहेत, ज्यांनी आपल्या शानदार गोलंदाजीने फलंदाजांचीच ‘पळता भुई थोडी’ केलीये. टी२० क्रिकेटमध्ये गोलंदाजांनी टाकलेले निर्धाव षटक खूप कमी वेळा पाहायला मिळते. विशेष म्हणजे, कोणत्याही गोलंदाजाने टी२० क्रिकेटमध्ये आणि खासकरून इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) निर्धाव षटक टाकणे, हे कल्पनेच्याही पलीकडचे आहे. मात्र, असे काही गोलंदाज आहेत, ज्यांनी आयपीएल इतिहासामध्ये सर्वाधिक निर्धाव षटके टाकली आहेत. या लेखातून आपण त्याच गोलंदाजांबद्दल जाणून घेणार आहोत.
आयपीएल इतिहासात सर्वाधिक निर्धाव षटके टाकणाऱ्या गोलंदाजांमध्ये अव्वल क्रमांकावर वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार (Praveen Kumar) आहे. त्याने आयपीएल इतिहासात सर्वाधिक निर्धाव षटके टाकली आहेत. प्रवीणने एकूण १४ निर्धाव षटके टाकली आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर माजी भारतीय अष्टपैलू इरफान पठाण (Irfan Pathan) आहे. त्याने आयपीएलमध्ये एकूण १० निर्धाव षटके टाकली आहेत.
यानंतर तिसऱ्या क्रमांकावर सनरायझर्स हैदराबाद संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आहे. भुवनेश्वरने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण ९ निर्धाव षटके टाकली आहेत. भुवनेश्वरनंतर चौथ्या क्रमांकावर संयुक्तरीत्या ३ खेळाडू आहेत. ८ निर्धाव षटकांसोबत तिसऱ्या क्रमांकावर धवल कुलकर्णी (Dhawal Kulkarni), संदीप शर्मा (Sandeep Sharma), आणि श्रीलंकेचा माजी गोलंदाज लसिथ मलिंगा (Lasith Malinga) आहे. या तिघांनंतर पाचव्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन (Dale Steyn) आहे. स्टेनने एकूण ७ निर्धाव षटके टाकली आहेत.
आयपीएल २०२२ची सुरुवात येत्या २६ मार्चपासून होत आहे. यातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघात मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर खेळला जाणार आहे.
आयपीएल इतिहासात सर्वाधिक निर्धाव षटके टाकणारे गोलंदाज
१४ वेळा- प्रवीण कुमार
१० वेळा- इरफान पठाण
०९ वेळा- भुवनेश्वर कुमाह
०८ वेळा- लसिथ मलिंगा, संदीप शर्मा, धवल कुलकर्णी
०७ वेळा- डेल स्टेन