चेन्नईच्या एमए चिदंबरम अर्थात चेपॉक स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड संघात दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्याचा आज (१४ फेब्रुवारी) दुसरा दिवस आहे. भारतीय संघाचा पहिला डाव दुसऱ्या दिवशी सकाळी ३२९ धावांवर संपुष्टात आला. मात्र, इंग्लंडचा सलामीवीर रॉरी बर्न्स पहिल्या डावात शून्यावर बाद होताच एक अनोखा विक्रम दोन्ही संघांच्या नावे जमा झाला.
दोन्ही संघांची नावे झाला आगळावेगळा विक्रम
चेन्नई येथे १३ फेब्रुवारी पासून सुरू झालेल्या दुसऱ्या सामन्यात दोन्ही संघांच्या सलामीवीरांनी शून्यावर बाद होत, एका नकोश्या विक्रमाला गवसणी घातली. भारताचा सलामीवीर शुबमन गिल पहिल्या दिवशी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली स्टोनच्या गोलंदाजीवर शून्य धावसंख्येवर पायचीत झाला होता. त्यानंतर, सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा सलामीवीर रॉरी बर्न्स याला भारताचा अनुभवी गोलंदाज इशांत शर्मा याने पायचीत केले. भारतीय मैदानांवर यापूर्वी देखील अशा प्रकारे दोन्ही संघांचे सलामीवीर दोन वेळा बाद झाले होते.
पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यात घडल्या होत्या अशा घटना
भारतीय मैदानांवर यापूर्वी दोन्ही संघाचा सलामीवीर खाते न खोलता बाद होण्याची घटना पहिल्यांदा भारत-पाकिस्तान यांच्या दरम्यान १९८७ सालच्या जयपुर कसोटीत घडली होती. त्यावेळी, भारताचे सलामीवीर सुनील गावसकर व पाकिस्तानचे सलामीवीर शोएब मोहम्मद एकही धाव न करता तंबूत परतले होते.
त्यानंतर, दुसऱ्यांदा याच वर्षी वेस्ट इंडिज संघ भारत दौऱ्यावर आला असता, दिल्ली येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारताचे कृष्णमाचारी श्रीकांत व वेस्ट इंडीजचे गॉर्डन ग्रीनिज हे सलामीवीर शून्यावर बाद झाले होते.
दुसऱ्या कसोटीवर भारताची मजबूत पकड
सलामीवीर रोहित शर्माच्या १६१, उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या ६७ व यष्टीरक्षक रिषभ पंतच्या नाबाद ५८ धावांच्या जोरावर भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावात ३२९ धावा फलकावर लावल्या. प्रत्युत्तरात, फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंडची अत्यंत खराब सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रापर्यंत इंग्लंडची स्थिती ५ बाद ८१ धावा अशी झाली. भारताकडून रविचंद्रन अश्विनने सर्वाधिक तीन गडी बाद केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
कमालच! इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारताला दिली नाही एकही अवांतर धाव, मोडला तब्बल ६६ वर्षे जुना विक्रम