येत्या २२ फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या संघांमध्ये पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. न्यूझीलंड मध्ये खेळवल्या जाणाऱ्या या मालिकेसाठी यजमानांनी आपला संघ जाहीर केला आहे. केन विलियम्सनच्या नेतृत्वाखालील १३ सदस्यीय संघाची घोषणा न्यूझीलंडच्या निवड समितीने केली. या संघात स्फोटक सलामीवीर मार्टिन गप्टिलचे पुनरागमन झाले आहे.
मार्टिन गप्टिल गेले काही महिने हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे संघाबाहेर होता. ३४ वर्षीय गप्टिल दुखापतीमुळे देशांतर्गत क्रिकेटमध्येही सहभागी होऊ शकला नव्हता. आत्ता देखील तो दुखापतीतून पूर्णपणे सावरला नसल्याने २१ वर्षीय फिन एलेनचा संघात स्टँडबाय म्हणून संघात समावेश केला गेला आहे. गप्टिल सामन्यापूर्वी पूर्णपणे फिट नसल्यास फिन एलेनला संधी मिळू शकते.
याबाबत बोलताना न्यूझीलंड संघाचे निवडकर्ते गेविन लार्सेन म्हणाले, “फिन एलेनने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगल्या धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याचा संघात समावेश केला आहे. अर्थातच मार्टिन गप्टिल आमचा अव्वल सलामीवीर आहे. त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात खोऱ्याने धावा काढल्या आहेत. त्यामुळेच सलामीवीर म्हणून आमची पसंती त्यालाच असेल.”
“मात्र मार्टिन गप्टिलला संघात खेळण्यासाठी आपला फिटनेस सिद्ध करावा लागेल. तो फिट नसेल तर फिन एलेनला संघात स्थान मिळेल”, असेही ते पुढे म्हणाले. केन विलियम्सन या संघाचा कर्णधार असेल आणि तो तिसऱ्या स्थानावर फलंदाजी करेल. विलियम्सनला यापूर्वी कोपराला दुखापत झाली होती, मात्र तो त्यातून सावरला असून पूर्णपणे फिट आहे. न्यूझीलंडने आपला पूर्ण ताकदीचा संघ या मालिकेसाठी उतरवला असून ऑस्ट्रेलियाने मात्र स्टीव स्मिथ, डेव्हिड वाॅर्नर आणि पॅट कमिन्स यासारख्या प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली आहे.
न्यूझीलंडचा संपूर्ण संघ-
केन विलियमसन (कर्णधार), हॅमिश बॅनेट, ट्रेंट बोल्ट, मार्क चँपमन, डेवन कॉनवे, मार्टिन गप्टिल, कायले जेमीसन, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचैल सैंटनर, टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), ईश सोधी आणि टिम साउदी.
महत्वाच्या बातम्या:
कमालच! इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारताला दिली नाही एकही अवांतर धाव, मोडला तब्बल ६६ वर्षे जुना विक्रम






