भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसरा सामना शनिवारी (२६ फेब्रुवारी) हिमाचल प्रदेशच्या धरमशाला मैदानावर पार पडला. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता आणि श्रीलंकेला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ५ विकेट्स गमावत निर्धारित २० षटकात १८३ धावांचा डोंगर उभा केला होता. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी भारतीय संघाकडून सलामीला रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि इशान किशन (Ishan Kishan) आले. मात्र, पहिल्या सामन्यात धडाकेबाज खेळी करणाऱ्या रोहितला या सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही. यावेळी त्याची विकेट घेणाऱ्या श्रीलंकेच्या गोलंदाजाने आपल्या नावावर एक विक्रम करत भल्या-भल्या गोलंदाजांना मागे टाकले आहे.
श्रीलंकेने दिलेल्या १८४ धावांचे आव्हान पार करण्यासाठी रोहित आणि इशान मैदानावर सज्ज होते. श्रीलंकेकडून पहिले षटक टाकण्यासाठी दुष्मंता चमीरा (Dushmantha Chameera) आला होता. त्याने आपला पहिला चेंडू रोहितला टाकला असता, त्याने या चेंडूवर एक धाव घेत इशानला स्ट्राईक दिली. इशानने पुढील ४ चेंडू खेळत पुन्हा स्ट्राईक रोहितला दिली. यावेळी १ धावेवर फलंदाजी करत असलेला रोहित दुष्मंताच्या शेवटच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला आणि तंबूत परतला.
Played on!
A big wicket for Sri Lanka as Dushmantha Chameera gets the wicket of Rohit Sharma 💥#INDvSL | 📝 https://t.co/rpWS0qitjC pic.twitter.com/C4u3ORLonz
— ICC (@ICC) February 26, 2022
रोहितची विकेट घेतल्यानंतर दुष्मंताच्या नावावर एक मोठा विक्रम झाला. चमीरा पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये एखाद्या ठराविक फलंदाजाला ५ किंवा त्यापेक्षा जास्त वेळा बाद करणारा पहिला आणि एकमेव गोलंदाज बनला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५ वेळा रोहित शर्माला बाद केले आहे.
यामध्ये त्याने टीम साऊदी, इश सोधी, जेसन बेहरेन्डोर्फ, ट्रेंट बोल्ट आणि ज्युनिअर दाला यांसारख्या जबरदस्त गोलंदाजांना मागे टाकले आहे. साऊदीने आतापर्यंत रोहितला ४ वेळा, तर सोधी, बेहरेन्डोर्फ, बोल्ट आणि दाला यांनी प्रत्येकी ३ वेळा रोहितला बाद केले आहे.
रोहित शर्माच्या पहिल्या सामन्यातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ३२ चेंडूंचा सामना करताना ४४ धावा ठोकल्या होत्या. त्यामध्ये १ षटकार आणि २ चौकारांचा समावेश होता.
रोहित शर्माला आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा बाद करणारे गोलंदाज
५ वेळा- दुष्मंता चमीरा*
४ वेळा- टीम साऊदी
३ वेळा- इश सोधी
३ वेळा- जेसन बेहरेन्डोर्फ
३ वेळा- ट्रेंट बोल्ट
३ वेळा- ज्युनिअर दाला
महत्वाच्या बातम्या-
फलंदाजीत सोडा, हिटमॅन रोहितचं क्षेत्ररक्षणातही अर्धशतक, बनला पहिलाच भारतीय; बघा तो खास क्षण
अय्यरमुळे पूर्ण झाला जडेजाचा बदला! सलग ६, ४, ६ ठोकणाऱ्या श्रीलंकन फलंदाजाला असं केलं चालतं