---Advertisement---

धावा तर नेहमीचीच गोष्ट, कोहलीला आऊट करण्याचाही आगळावेगळा विक्रम जेव्हा होतो

On: शनिवार, फेब्रुवारी 29, 2020 9:10 AM
---Advertisement---

क्राईस्टचर्च। न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात हेगली ओव्हल स्टेडियमवर आजपासून(29 फेब्रुवारी) दुसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरला.

मात्र भारताची सुरुवात चांगली झाली नाही. भारताने 33 षटकांच्या आतच 4 विकेट्स गमावल्या. यामध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीच्याही विकेटचा समावेश आहे. विराटला 3 धावांवर असताना टीम साऊथीने पायचीत केले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटला बाद करण्याची साऊथीची ही 10 वी वेळ आहे. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटला सर्वाधिकवेळा बाद करणारा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने आत्तापर्यंत कसोटीत 3 वेळा वनडेमध्ये 6 वेळा आणि टी20मध्ये 1 वेळा विराटला बाद केले आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटला सर्वाधिक वेळा बाद करणाऱ्या गोलंदाजांमध्ये साऊथी पाठोपाठ इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसन आणि ग्रॅमी स्वान आहेत. या दोघांनीही विराटला प्रत्येकी 8 वेळा बाद केले आहे.

आजपासून सुरु झालेल्या न्यूझीलंड विरुद्ध भारत कसोटी सामन्यात विराट बरोबरच भारताने मयंक अगरवाल, अजिंक्य रहाणे यांच्याही विकेट्स स्वस्तात गमावल्या. अगरवाल आणि रहाणे प्रत्येकी 7 धावा करुन बाद झाले. तर पृथ्वी शॉने सुरुवातीला चांगला खेळ करताना अर्धशतकी खेळी केली. त्याने 64 चेंडूत 54 धावा केल्या. पण अर्धशतक पूर्ण करताच तो काईल जेमिसनच्या चेंडूवर झेलबाद झाला. सध्या हनुमा विहारी आणि चेतेश्वर पुजारा खेळत आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीला सर्वाधिक वेळा बाद करणारे गोलंदाज – 

10 वेळा – टीम साऊथी

8 वेळा – जेम्स अँडरसन

8 वेळा – ग्रॅमी स्वान

7 वेळा – मॉर्ने मॉर्केल

7 वेळा – ऍडम झम्पा

7 वेळा – नॅथन लायन

7 वेळा – रवी रामपाल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---