निवृत्त क्रिकेटपटूंसाठी खेळल्या जाणाऱ्या लिजेंड्स लीग क्रिकेट या स्पर्धेचा दुसरा हंगाम सप्टेंबर महिन्यात भारतात खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत चार विविध संघ सामील होतील. त्यानंतर १६ सप्टेंबर रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने भारताच्या माजी क्रिकेटपटूंचा इंडिया महाराजा हा संघ इतर देशांच्या निवृत्त खेळाडूंच्या रेस्ट ऑफ वर्ल्ड संघाशी एक खास सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांची घोषणा नुकतीच झाली होती. मात्र, त्यानंतर आता या स्पर्धेशी एक नवा वाद जोडला जात आहे.
लिजंड्स लीग क्रिकेटचे आयुक्त व माजी भारतीय क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी दोन्ही संघांची घोषणा केली होती. यातील इंडिया महाराजा संघाचे नेतृत्व बीसीसीआय अध्यक्ष व माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली करणार आहे. तर विरुद्ध संघात अनेक नामवंत खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा हर्शेल गिब्सचाही समावेश होता. मात्र, गिब्सला संधी दिल्याने भारतीयांनी सौरव गांगुली याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांकडून सोशल मीडियावर Boycott Sourav Ganguly हा ट्रेंड चालवला जातोय.
या ट्रेंड मागील कारण म्हणजे गिब्स याने मागील वर्षी पाकिस्तानच्या कश्मीरमधील वादग्रस्त कश्मीर प्रीमियर लीगमध्ये सहभाग नोंदवला होता. तसेच, या मुद्द्यावर प्रतिक्रिया देखील दिली होती. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांदरम्यान हा सीमावाद प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे या संवेदनशील प्रश्नावर गिब्सने प्रतिक्रिया देऊ नये, असे अनेकांना वाटत होते.
गिब्सला स्पर्धेत सहभाग घेऊ नये अशी भूमिका काही लोकांनी मांडली आहे. यावर आयोजक लवकरात लवकर निर्णय घेऊन हा वाद मिटवण्याचा प्रयत्न करतील.