भारत विरुद्ध इंग्लंड संघादरम्यान ४ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना नॉटिंघमच्या मैदानात खेळविण्यात येणार आहे. भारतीय संघाने मागील ३ इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिका गमावल्या आहेत. त्यामुळे भारतीय संघाला यंदाच्या इंग्लंड दौऱ्यात हा इतिहास बदलवण्याची यंदा चांगली संधी आहे, तसे होण्याचा विश्वासही अनेक दिग्गजांनी व्यक्त केला आहे. ज्यात ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू ब्रॅड हॉगचा देखील समावेश आहे.
त्याच्या मते भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात पराभूत जरी झाला असला, तरी भारतीय संघाने इंग्लंड दौऱ्यासाठी चांगला सराव केला आहे. खूप वेळ भारतीय संघाने इंग्लंडच्या भूमीत व्यतीत केला आहे. त्याचबरोबर भारतीय संघाने काउंटी सिलेक्ट इलेव्हन संघाविरुद्ध ३ दिवसीय सराव सामना देखील खेळला आहे. त्यामुळे भारतीय संघाची चांगली तयारी झाली आहे.
भारतीय संघ जेव्हा २०१८ साली इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. तेव्हा भारतीय संघाला ४-१ ने पराभव पत्करावा लागला होता. असे असले तरी ही नवीन मालिका आहे. भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यापासून जवळपास २ महिने इंग्लंडमध्ये आहे. अशात भारतीय खेळाडू तिथल्या वातावरणाशी एकरूप झाला असेल. तसेच त्यांचा नियमित सराव देखील चालू आहे, असे हॉगने त्याच्या यूट्यूब चॅनल वरून सांगितले.
त्याचबरोबर भारतीय संघात असलेले गोलंदाज हे भारतीय संघाची मजबूत बाजू आहे. त्यात जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज असे वेगवान गोलंदाज आहेत, असेही हॉग म्हणाला.
त्याचबरोबर हॉगच्या मते शमी भारतासाठी ‘हुकुमी एक्का’ ठरू शकतो. कारण गेल्या काही काळापासून शमीने त्याच्या गोलंदाजीत सातत्यपूर्णता दाखवली असून जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात त्याने अत्यंत उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन केले होते. त्याने जर अशीच कामगिरी या दौर्यात केली, तर भारताच्या विजयात तो मोलाची भूमिका निभावू शकतो, असेही तो म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या –
–खेळातच नाही तर कमाईतही एक नंबर आहे पीव्ही सिंधू