कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच आयोजित झालेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात बुधवारी (२३ जून) न्यूझीलंडने भारतीय संघाचा ८ गड्यांनी पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. भारताच्या या पराभवानंतर अनेक जण या पराभवाची मीमांसा करताना दिसत आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉग याने भारतीय संघ कोणत्या क्षणी सामना हरला याबाबत प्रतिक्रिया दिली.
अखेरच्या सत्रात न्यूझीलंडने मिळवला विजय
भारतीय क्रिकेट संघाला न्यूझीलंडच्या हातून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात अखेरच्या दिवशी अखेरच्या सत्रात पराभव पत्करावा लागला. भारतीय संघाने न्यूझीलंडला दुसऱ्या डावात ५४ षटकात १३९ धावांचे लक्ष्य दिले होते. न्यूझीलंडने ४४ धावांत दोन गडी गमावल्यानंतर कर्णधार केन विलियम्सन व अनुभवी रॉस टेलर यांनी अखेरपर्यंत नाबाद राहत संघाला विजय मिळवून दिला होता.
या क्षणी माघारला भारतीय संघ
ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू व सध्या समालोचक म्हणून काम करणाऱ्या ब्रॅड हॉग याने भारतीय संघ या सामन्यात माघारला त्या क्षणाचा उल्लेख करताना म्हटले, “१३९ धावा म्हणजे इतके काही मोठे लक्ष नव्हते. मात्र, सामना अनिर्णित राखण्याची तसेच भारतीय संघाला विजयाची थोडी संधी निर्माण झाली होती. सलामीवीर माघारी परतल्यानंतर, न्यूझीलंडला विजयासाठी ५५ धावा हव्या असताना चेतेश्वर पुजाराने रॉस टेलरचा झेल सोडला होता. ती संधी पकडली असती तर काहीही घडले असते. कारण, पुढील फलंदाज हेन्री निकोल्स हा अनुभवी नव्हता आणि बीजे वॉटलींगला दुखापत झाली होती. केन विलियम्सनवर दडपण आले असते. या सर्व काळात तो बाद देखील होऊ शकला असता.”
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाने सांघिक कामगिरी करत भारतीय संघावर वर्चस्व गाजवले. केन विलियम्सनने दोन्ही डावात जबाबदारीने खेळ केला. युवा वेगवान गोलंदाज कायले जेमिसनने दोन्ही डावात मिळून ७ भारतीय फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलेला. तोच या सामन्याचा मानकरी ठरला.
महत्त्वाच्या बातम्या –
‘हे’ होते १९८३ विश्वचषक विजेत्या संघातील सर्वात सभ्य आणि खोडकर खेळाडू, कर्णधाराने केला खुलासा
चौफेर टीका होणार्या भारतीय संघाच्या मदतीला धावला गांगुली, ‘या’ शब्दांत केली पाठराखण