वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान (IND vs ENG) दोन्ही देशांमध्ये 20 जुलै रोजी एजबॅस्टन मैदानावर सामना होणार होता. पण भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे भारत-पाकिस्तान यांच्यातील हा सामना रद्द करण्यात आला.
सामना रद्द झाल्यानंतर अनेक माजी क्रिकेटपटूंनी आपली मते मांडली आहेत. यामध्ये आता ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज खेळाडू ब्रेट ली (Bret Lee) याचेही नाव समाविष्ट झाले आहे. त्याने भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांबाबत काही मोठ्या गोष्टी सांगितल्या आहेत.
सामना रद्द झाल्यानंतर ब्रेट ली म्हणाला, हा प्रश्न खूप कठीण आहे. पण मी एवढंच म्हणेन की मला भारतावर खूप प्रेम आहे आणि मला पाकिस्तानवरही तितकंच प्रेम आहे. त्यामुळे माझी आशा आहे की, दोन्ही देश असे निर्णय घेतील की ज्यामुळे एकमेकांची किंमत समजून घेता येईल. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण इथे एका स्पर्धेसाठी आलो आहोत. भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका सर्व संघ सहभागी आहेत. त्यामुळे काल रात्री जे काही घडलं, ते घडलं. आम्ही सामना होण्यासाठी प्रयत्न केला.
दरम्यान, 22 एप्रिल रोजी भारतातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानातील अनेक दहशतवादी ठिकाणांवर मोठी कारवाई केली. या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्या सीमेवर तणाव निर्माण झाला आणि लष्करी संघर्षही झाला. त्याच दरम्यान पाकिस्तानच्या काही खेळाडूंनी भारतीय लष्कराबद्दल वादग्रस्त वक्तव्ये केले. त्यामुळे भारतात पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्याला मोठा विरोध झाला आणि अखेर हा सामना रद्द करण्यात आला.
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स स्पर्धेत इंडिया चॅम्पियन्स आता आपला पुढील सामना 22 जुलै रोजी साउथ आफ्रिका चॅम्पियन्सविरुद्ध खेळणार आहे.






