गेल्या दोन दिवसांपासून ऍडलेड येथे चालू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली मायदेशी परतणार आहे. आपल्या पहिल्या अपत्याच्या जन्मानिमित्त विराटने पालकत्त्व रजा घेत भारतात परतण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उर्वरित तीन कसोटी सामन्यात उपकर्णधार अजिंक्य रहाणे भारतीय संघाचे नेतृत्त्व करेल. अशात ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने विराटच्या होणाऱ्या बाळाविषयी मोठे भाष्य केले आहे.
..तर विराटचे पहिले बाळ बनणार ऑस्ट्रेलियन खेळाडू
विराटची इच्छा असल्यास त्याच्या पहिल्या मुलाचा जन्म ऑस्ट्रेलियामध्ये होऊ शकतो. जर खरेच असे झाल्यास ऑस्ट्रेलियामध्ये विराटच्या मुलाचे स्वागत आहे. थोडक्यात सांगायचे झाले, तर येत्या काही वर्षात विराटचा मुलगा ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाकडून क्रिकेट खेळू शकतो असे ली याचे म्हणणे आहे.
माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत बोलताना ब्रेट ली याने या विषयावर आपले मत मांडले. तो म्हणाला की, “दिग्गज फलंदाज विराट कोहलीची इच्छा असेल, तर ऑस्ट्रेलियामध्ये त्याच्या पहिल्या अपत्याचा जन्म होऊ शकतो. जर खरोखरच विराटचे बाळ ऑस्ट्रेलियाच्या मातीत जन्मले, तर आम्ही विराटच्या बाळाचा स्विकार करायला तयार आहोत. विराटचे पहिले अपत्य मुलगा असो वा मुलगी, याने आम्हाला कसलाही फरक पडत नाही. भविष्यात त्याच्या मुलाला किंवा मुलीला ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाची टोपी घातली जाईल.”
विराटचे पहिल्या कसोटी सामन्यात दमदार प्रदर्शन
विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दिवस- रात्र कसोटी सामन्यात फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण दोन्हीमध्येही कमालीचे प्रदर्शन केले आहे. प्रथम फलंदाजी करताना त्याने भारतीय संघाच्या पहिल्या डावात सर्वाधिक धावा केल्या. त्याने ८ चौकारांच्या मदतीने ७४ धावा करत त्याने भारतीय संघाला २४४ धावांचा आकडा गाठण्यात मोठे योगदान दिले.
तसेच ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव चालू असताना तो क्षेत्ररक्षणातही पुढे होता. विराटने कॅमरॉन ग्रीन आणि नॅथन लायन यांचा झेल पकडत संघाला दोन विकेट मिळवून दिल्या. यामुळे भारतीय संघ पहिल्या डावात ६२ धावांनी आघाडीवर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“…म्हणून ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरले अपयशी”, माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राने सांगितले कारण
प्रकाशझोतात गुलाबी चेंडूने खेळणे सोपे नाही, ऑस्ट्रेलियन कर्णधाराची प्रतिक्रिया
अश्विनला गृहीत धरणे महागात पडले, माजी कर्णधाराचा ऑस्ट्रेलियाला घरचा आहेर