भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या बॉर्डर-गावसकर मालिकेतील एॅडिलेड कसोटी सामन्याच्या दुसर्या दिवशी भारतीय गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला. भारतीय संघ पहिल्या डावात २४४ धावांवर सर्वबाद झाला असल्याने संकटात सापडले असल्याचे सगळ्यांना वाटले होते. मात्र भारतीय गोलंदाजांनी कमाल करत ऑस्ट्रेलियाचा डाव १९१ धावांवर संपुष्टात आणला.
ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांपुढे नांगी टाकल्याचे दिसून आले. यावर ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राने प्रतिक्रिया दिली. गोलंदाजांना दबाव निर्माण करण्याची संधी दिल्यामुळे ऑस्ट्रेलियन फलंदाजांचे नुकसान झाल्याचे मत मॅकग्राने व्यक्त केले.
अति बचावात्मक पवित्र्याने नुकसान
ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियाच्या डावाचे विश्लेषण करताना ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या दृष्टिकोनावर टीका केली. तो म्हणाला, “ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करणे गरजेचे होते. ते खराब चेंडूची वाट पाहत राहिले आणि एकेरी-दुहेरी धावांवर भर देण्याऐवजी अधिकच बचावात्मक होत गेले. यामुळे भारतीय गोलंदाजांना त्यांच्यावर दबाव निर्माण करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचा त्यांनी पुरेपूर फायदा उठवला.”
खेळावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असते असं सांगत मॅकग्रा म्हणाला, “भारतीय गोलंदाजाचे पूर्ण डावात खेळावर नियंत्रण होते. ते त्यांना हव्या असलेल्या टप्प्यावर गोलंदाजी करत होते. ऑस्ट्रेलियन फलंदाज एकेरी-दुहेरी धावा काढत नसल्याने त्यांच्या समस्या अधिकच वाढल्या. बचावात्मक खेळत राहिलात तर कधी ना कधी तुम्ही बाद होणारच आहात. त्यामुळे आक्रमक फटके खेळून गोलंदाजांवर दबाव टाकणे कायमच गरजेचे असते.”
भारतीय गोलंदाजांची सांघिक कामगिरी
पहिल्या डावात अवघ्या २४४ धावा काढल्याने भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांना कमी धावात रोखण्याचे आव्हान होते. मात्र गोलंदाजांनी सांघिक कामगिरीने हे आव्हान लीलया पेलले. त्यामुळे बलाढ्य वाटणारी ऑस्ट्रेलियन फलंदाजी अवघ्या १९१ धावात कोसळली. भारताकडून आर अश्विनने सर्वाधिक ४ बळी घेतले. तर उमेश यादवने ३ आणि जसप्रीत बुमराहने २ बळी घेत त्याला सुयोग्य साथ मिळाली. त्यामुळे भारताला पहिल्या डावात ५३ धावांची बहुमोल आघाडी मिळाली.
संबंधित बातम्या:
– AUS vs IND Test Live : दुसरा दिवस भारतीय गोलंदाजांच्या नावावर; दिवसाखेर भारताला ६२ धावांची आघाडी
– अश्विनला गृहीत धरणे महागात पडले, माजी कर्णधाराचा ऑस्ट्रेलियाला घरचा आहेर
– फ्लड लाइट्स मध्ये गुलाबी चेंडूने खेळणे सोपे नाही, ऑस्ट्रेलियन कर्णधाराची प्रतिक्रिया