वेस्ट इंडिज संघ आयसीसी विश्वचषक 2023 क्वालिफायर फेरीतून बाहेर पडला. त्यामुळे संघाला वर्षाच्या अखेरीस भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत भाग घेता येणार नाही. विंडीजच्या पराभवानंतर दिग्गज फलंदाज ब्रायन लारा याला संघाचा प्रदर्शन मार्गदर्शक म्हणून नेमण्यात आले. विशेष म्हणजे, भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून उभय संघात 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 टी20 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेपूर्वी लाराने भारतीय संघाविषयी मोठे विधान केले आहे. त्याचे विधान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
काय म्हणाला लारा?
ब्रायन लारा (Brian Lara) म्हणाला की, “आम्हाला दोन महत्त्वाचे कसोटी सामने खेळायचे आहेत. यामधून आमची दोन वर्षांची सायकल (जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा) सुरू होईल. हे भारताविरुद्ध आहे आणि भारतीय संघ त्यांच्या मायदेशात खेळो किंवा बाहेर, तो जगातील अव्वल संघांपैकी एक आहे.”
पुढे बोलताना लारा म्हणाला की, “मी शिबिराच्या अनुभवावरून म्हणू शकतो की, खेळाडू योग्य दिशेने पुढे जात आहेत. डॉमिनिका येथील पहिल्या सामन्याला आता काहीच दिवस शिल्लक आहेत, पण हा एक युवा समूह आहे, ज्याचे नेतृत्व क्रेग ब्रेथवेट करत आहे.”
जगातील दिग्गज फलंदाजांच्या यादीत सामील असलेल्या लारान म्हटले की, “मला वाटते की, या मालिकेतील काही खेळाडू आपली ओळख निर्माण करतील. भारत एक कठीण प्रतिस्पर्धी आहे, पण मला वाटते की, आम्ही अशाप्रकारे खेळाडूंकडून त्यांची सर्वोत्तम कामगिरी काढून घेऊ शकतो.”
वेस्ट इंडिज संघाने या मालिकेसाठी डाव्या हाताच्या दोन नवीन फलंदाजांचा ताफ्यात समावेश केला आहे. त्यामध्ये किर्क मॅकेंझी आणि एलिक अथानाजे यांचा समावेश आहे. यांच्याविषयी बोलताना लारा म्हणाला की, “हे दोन्ही खेळाडू शानदार आहेत. सध्या युवा आहेत आणि त्यांच्याकडे प्रथम श्रेणीचा जास्त अनुभव नाहीये. मात्र, त्यांच्या खेळण्याची शैली आणि दृष्टिकोन पाहता, माझा विश्वास आहे की, त्यांच्याकडे उच्च स्तराचे प्रदर्शन करण्यासाठी आवश्यक गोष्टी आहेत.”
लक्षात घेण्यासारखी बाब अशी की, मागील डब्ल्यूटीसी सायकलमध्ये संघ 4 विजय आणि 7 पराभवांसह आठव्या स्थानी राहिला होता. आता नवीन डब्ल्यूटीसी 2023-25 सायकलनुसार वेस्ट इंडिज विरुद्ध भारत (West Indies vs India) संघातील पहिल्या कसोटी सामन्याला 12 जुलैपासून सुरुवात होत आहे. हा सामना डॉमिनिका येथे खेळला जाणार आहे. (brian lara gives big statement ahead of india vs west indies test series says this read here)
महत्वाच्या बातम्या-
ऑटोग्राफ मागायला आलेल्या मुलीवरच झाले गावसकरांना प्रेम, वाचा त्यांची प्रेमकहाणी
घातक वेगवान गोलंदाजांविरुद्ध हेल्मेटशिवाय का खेळायचे गावसकर? ‘हे’ होतं कारण