इंग्लंड संघाचा येत्या जूनपासून मायदेशातील क्रिकेटचा हंगाम सुरु होत आहे. २ जूनपासून इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात २ सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेपूर्वी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने एक मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
इंग्लंड क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने म्हटले आहे की, आगामी काळात होणाऱ्या कोणत्याही कसोटी सामन्यातून बाहेर ठेवल्यास मला हरकत नाही. तथापि त्याने स्पष्ट केले की सर्व सामने खेळण्यास भेटल्यावर आनंदच आहे. विशेष म्हणजे 2020 मध्ये वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून वगळल्यानंतर ब्रॉडने तेव्हा नाराजी व्यक्त केली होती.
स्टुअर्ट ब्रॉडने ब्रिटीश माध्यमांना सांगितले की, “गेल्या वर्षी मी असमाधानी होतो, कारण निवडकर्ते तेव्हा म्हणाले होते की त्या मोसमातील पहिली कसोटी खेळणार संघ आमचा सर्वोत्कृष्ट संघ असेल. स्टुअर्ट ब्रॉड पुढे म्हणाला की, ॲशेस व दक्षिण आफ्रिकेविरूद्ध ज्या खेळाडूने उत्तम कामगरी केली त्या खेळाडूला अशाप्रकारे संघातून बाहेर करायला नको होते. मला वाटले होते की मी सर्वोत्कृष्ट संघात आहे पण अचानक मला सर्वोत्कृष्ट संघातून वगळण्यात आले. ”
त्या घटनेबद्दल निषेध नोंदवण्यासाठी ब्रॉडने स्काय स्पोर्ट्स या चॅनल वर भाष्य करत नाराजी व्यक्त केली होती. ब्रॉडला यावर्षी मात्र चांगल्या संवादाची अपेक्षा आहे.
आगामी काळात इंग्लंड संघाला न्यूझीलंडविरुद्ध 2 आणि भारता विरुद्ध 5 कसोटी सामने खेळायचे आहेत. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ इंग्लंडला पोहोचला आहे. न्यूझीलंडसह साऊथॅम्प्टन येथे होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी भारतीय संघ इंग्लंडमध्ये जाणार आहे. हा सामना 18 जूनपासून खेळला जाणार आहे.
जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये गणल्या जाणाऱ्या ब्रॉडसाठी आगामी न्युझीलंड विरुद्धची मालिका महत्त्वाची असणार आहे. न्यूझीलंड तसेच भारताविरुद्धच्या मालिकांमध्ये शानदार कामगिरी केल्यास ब्रॉडला ॲशेसमध्ये एक प्रमुख खेळाडू म्हणून खेळण्याची मोठी संधी असणार आहे.
यावर्षीच्या अखेरिस इंग्लंडचा संघ ॲशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. अशा या महत्त्वाच्या क्रिकेट मोसमात इंग्लंड समर्थकांना ब्रॉडकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा असणार आहेत. हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की वाढत्या वयाला झुगारून ब्रॉड मैदानात कशाप्रकारे कामगिरी करतो.
महत्त्वाच्या बातम्या –
बीसीसीआयने पाळला दिलेला शब्द; अजूनही उचलत आहेत ‘त्या’ खेळाडूंचा खर्च
इंग्लंडची खेळाडू डॅनियल वॅटच्या लग्नाच्या प्रस्तावावर विराटच्या आईने दिली होती ‘अशी’ प्रतिक्रिया
रोहित किंवा पोलार्ड नाही तर ‘हा’ आहे अर्जुन तेंडूलकरचा आवडता मुंबई इंडियन्स संघातील खेळाडू