ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग या टी20 लीग स्पर्धेला 13 डिसेंबरपासून सुरू झाली आहे. या स्पर्धेतील पहिला सामना मेलबर्न स्टार्स विरुद्ध सिडनी थंडर संघात खेळला गेला. मनुका ओव्हल, कॅनबेरा येथे खेळला गेलेला हा सामना सिडनी थंडर संघाने 1 विकेटने आपल्या खिशात घातला. असे असले, तरीही मेलबर्नच्या खेळाडूने असा काही झेल घेतला, ज्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. या झेलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
ब्रॉडी काऊचचा अविश्वसनीय झेल
मेलबर्न स्टार्स विरुद्ध सिडनी थंडर (Melbourne Stars vs Sydney Thunder) संघातील या सामन्यात सिडनीने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी मेलबर्नने निर्धारित 20 षटकात 8 विकेट्स गमावत 122 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान पार करण्यासाठी सिडनीकडून मॅथ्यू गिल्कस आणि ऍलेक्स हेल्स मैदानात उतरले. मात्र, पहिलाच बीबीएल सामना खेळत असलेल्या न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट याने त्याच्या दुसऱ्याच चेंडूवर सिडनीला मोठा धक्का दिला. डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या गिल्कसला बोल्टने शून्यावर तंबूत धाडले.
गिल्कसचा शानदार झेल शॉर्ट फाईन लेगवर ब्रॉडी काऊच (Brody Couch) याने झेलला. खरं तर, गिल्कसला बोल्टच्या दुसऱ्याच चेंडूवर डाव्या बाजूला चौकार मारायचा होता. मात्र, बेट आणि चेंडूमध्ये योग्य संपर्क झाला नाही आणि चेंडू हवेत उडाला. यावेळी शॉर्ट फाईन लेगवर उभ्या असलेल्या ब्रॉडीने 3 वेळा हवेत उडालेला चेंडू धडपडत झेलला. यादरम्यान त्याला झेल घेताना पाहून संघसहकारी भलतेच खुश असल्याचे दिसले. यावेळी गोलंदाज बोल्टही खळखळून हसला. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
One of the more ridiculous catches you will see! #BBL12 @BKTtires | #GoldenMoment pic.twitter.com/mppFakDxgC
— cricket.com.au (@cricketcomau) December 13, 2022
सिडनी थंडरचा विजय
सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर मेलबर्नने दिलेल्या 122 धावांचे आव्हान सिडनी थंडर्स संघाने 9 विकेट्स गमावत पूर्ण केले. यावेळी सिडनीसाठी ऍलेक्स रॉस याने सर्वाधिक धावा कुटल्या. त्याने 27 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 28 धावा चोपल्या. यावेळी मेलबर्न संघाकडून गोलंदाजी करताना नॅथन कुल्टर- नाईल याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने 4 षटकात 19 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त ट्रेंट बोल्ट, ब्यू वेबस्टर आणि कर्णधार ऍडम झॅम्पा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स आपल्या नावावर केल्या. (brody couch caught a surprising catch in big bash league 2022 see video here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: बांगलादेशी गोलंदाजांची उमेश यादवने वाजवली बॅंड, दुसऱ्याच चेंडूवर ठोकला 100 मीटरचा षटकार
उमेश यादव उडवला बांगलादेशी फलंदाजाचा त्रिफळा, व्हिडिओ होतोय व्हायरल