अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 8 मार्च रोजी होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या अंतिम सामन्याची भारतीय चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या जेतेपदाच्या लढतीत टीम इंडियाचा (India vs Newzealand) सामना न्यूझीलंडशी होणार आहे. दोन्ही संघांकडे असे खेळाडू आहेत जे कधीही सामन्याचा कल बदलू शकतात, पण सध्या सर्वात जास्त चर्चा आहे ती भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत (Jasprit Bumrah) बुमराहची.
इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये बुमराहने शेवटची 2 षटके ज्या प्रकारे टाकली, त्याची दहशत आता फायनलपूर्वी न्यूझीलंडच्या गोटातही दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर, न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत बुमराहबद्दल (Mitchell Sentner on jasprit Bumrah and team india) विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले आहे. सँटनर म्हणाला की, जसप्रीत बुमराह ज्या प्रकारे खेळत आहे, त्याबद्दल सर्वांनीच चर्चा करायला हवी. इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये त्यानेच एकहाती सामना फिरवला होता. यात शंका नाही की तो एक जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे, पण भारतीय संघात फक्त तो एकटाच आमच्यासाठी धोका नाही.
सँटनरने पुढे असेही नमूद केले की, भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूने फलंदाजी किंवा गोलंदाजीमध्ये कोणत्या ना कोणत्या सामन्यात मोलाचे योगदान दिले आहे आणि एक संघ म्हणून तुम्हाला हेच हवे असते. त्यामुळे आम्हाला बुमराहसोबतच टीम इंडियाच्या इतर खेळाडूंसाठीही रणनीती आखावी लागेल.
अंतिम सामन्याच्या दबावाबद्दल बोलताना सँटनर म्हणाला की, हा फक्त एक सामान्य सामना आहे, असे म्हणणे सोपे आहे, पण वस्तुस्थिती तशी नसते हे सर्वांना माहित आहे. मात्र, आम्हाला आमची तयारी इतर सामन्यांप्रमाणेच सामान्य ठेवावी लागेल. टी-20 क्रिकेटमध्ये असे काही महत्त्वाचे क्षण येतात जिथून संपूर्ण खेळ बदलतो आणि आम्हाला त्या क्षणांसाठी सज्ज राहावे लागेल.






