भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ३ सामन्यांच्या वनडे व टी२० मालिका पार पडल्या आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाने वनडे, तर भारताने टी२० मालिका आपल्या खिशात घातली आहे. यानंतर आता सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष १७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या ४ कसोटी सामन्यांच्या बहुप्रतिक्षित ‘बॉर्डर- गावसकर ट्रॉफी’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या मालिकेकडे आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर कर्णधार विराट कोहली पालकत्व रजा घेवून भारतात परतणार आहे, अशा परिस्थितीत मालिका विजय मिळवण्यासाठी सर्वच खेळाडूंना आपला खेळ थोडा अधिक उंचवावा लागेल. कसोटी मालिकेत विजय मिळवण्यासाठी गोलंदाजांना सर्वोत्तम कामगिरी करणे गरजेचे असते. या पूर्ण मालिकेमध्ये सर्व क्रिकेट पंडितांची नजर भारताच्या या ३ गोलंदाजांच्या कामगिरीवर असेल.
१. जसप्रीत बुमराह
भारताच्या या वेगवान गोलंदाजाकडून सर्व क्रिकेट रसिकांना चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलियाच्या २०१८-१९ दौऱ्यात बुमराहने उत्तम कामगिरी करत भारताला मलिका विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. या दौऱ्यात देखील त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा भारतीय संघाला असेल.
२. मोहम्मद शमी
मोहम्मद शमीने मागील काही वर्षात भारताकडून उत्तम कामगिरी केली आहे. शमीने भारताकडून खेळलेल्या एकूण ४९ कसोटी सामन्यांत १८० बळी मिळवले आहेत. विदेशी दौऱ्यात शमीने अनेक वेळा आपल्या गोलंदाजीने सर्वांची वाहवा मिळवली आहे. आगामी कसोटी मालिकेत देखील सर्वांच्या नजरा त्याच्याकडे असतील.
३. आर अश्विन
भारताचा दिग्गज फिरकी गोलंदाज आर अश्विनने आपल्या गोलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केले आहे. भारताकडून खेळलेल्या ७१ कसोटी सामन्यांत त्याने तब्बल ३६५ बळी मिळवले आहेत. मागील काही विदेशी दौऱ्यात अश्विन आपल्या फिटनेसमुळे सर्व सामने खेळण्यात अयशस्वी ठरला आहे. यावेळी मात्र तो पूर्णतः फिट जाणवतो आहे व त्याच्याकडून भारतीय संघाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
हेही वाचा-
भारतीय संघाची अष्टपैलूची चिंता कोण मिटवणार? ‘या’ ५ खेळाडूंचे आहेत पर्याय






