भारतीय संघाला दमदार अष्टपैलू खेळाडूची गरज आहे. खासकरून मर्यादित षटकांच्या सामन्यांत भारतीय संघाला त्याची उणीव भासत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाला वनडेत मालिकेत पराभव होण्याचे महत्वाचे कारण सहाव्या गोलंदाजाचा पर्याय नसणे, हेच असल्याचं मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले होते. संघात हार्दिक पंड्या आणि रविंद्र जडेजा हे दोन अष्टपैलू खेळाडू आहेत, परंतु पंड्या पाठीच्या दुखापतीमुळे गोलंदाज करू शकत नाही.
अष्टपैलू खेळाडूच्या कमतरतेबाबत भारतीय कर्णधार विराट कोहलीने बर्याचदा वक्तव्य केले आहे. नुकत्याच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पहिला वनडे सामना गमावल्यानंतर सहाव्या गोलंदाजांची कमतरता बोलून दाखवली होती. तेव्हा तो म्हणाला होता की, “दुर्दैवाने हार्दिक पंड्या सध्या गोलंदाजी करण्यासाठी पूर्णपणे सक्षम नाही आणि आमच्या जवळ मार्क्स स्टाॅयनिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यासारखा दुसऱ्या अष्टपैलू खेळाडूचा पर्याय नाही.”
येणार्या मालिकेसाठी भारतीय संघात सहाव्या गोलंदाज अष्टपैलूच्या शर्यतीत वाॅशिंग्टन सुंदर, राहुल तेवातीया, कृणाल पंड्या सर्वात पुढे आहेत. याच्याव्यतिरिक्त विजय शंकर, शिवम दुबे हे पर्याय असू शकतात. यांची आयपीएल स्पर्धेत शानदार कामगिरी राहिली आहे.
कृणाल पंड्याला कसोटी आणि वनडे पदार्पणाची प्रतीक्षा
कृणाल पंड्या भारतीय संघात आतापर्यंत 18 टी-20 सामने खेळला आहे. त्यामधे त्याने 8.11च्या इकाॅनामीने 14 विकेट्स घेतल्या आहेत. त्याला कसोटी आणि वनडेत पर्दापणाची प्रतीक्षा आहे. आयपीएल स्पर्धेत त्याने 71 सामन्यात 46 विकेट प्राप्त केल्या आहेत. कृणाल पंड्या भारतीय संघासाठी सहावा गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू एक उत्तम पर्याय आहे.
फिरकी अष्टपैलू वाॅशिंग्टन सुंदर
नुकत्याच ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या टी-20 मालिकेत वाॅशिंग्टन सुंदरने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे तो सहावा गोलंदाज म्हणून भारतीय संघासाठी एक चांगला पर्याय उपलब्ध आहे. त्याने तीन टी-20 सामन्यात 2 विकेट घेतल्या होत्या. सुंदरने जास्तीत जास्त सलामी गोलंदाज म्हणून भूमिका निभावली आहे.
राहुल तेवातिया आहे एक सक्षम पर्याय
आयपीएलच्या तेराव्या हंगामात राहुल तेवातीयाने दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे तो उत्कृष्ट अष्टपैलू चर्चिला गेला होता. परंतु त्याने अजूनपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले नाही. राहुल तेवातीया आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघासाठी खेळतो. त्याने यंदाच्या स्पर्धेत 14 सामन्यात 232 धावा करताना 10 विकेट्स घेतल्या होत्या.
यापूर्वी विजय शंकरला मिळाली होती संधी
विजय शंकरला आता भारतीय कसोटी संघात पदार्पण करण्याची प्रतिक्षा आहे. आतापर्यंत त्याने भारतीय संघासाठी 9 टी-20 आणि 13 वनडे सामने खेळले आहेत. बर्याचदा फलंदाजीची संधी मिळाल्यावर धावांचा पाठलाग करताना नाबाद राहिला आहे आणि विजय मिळवून दिला आहे. त्याने टी-20 मध्ये 5 आणि वनडेत 4 विकेट्स घेतल्या आहेत.
मुंबईकर शिवम दुबेचा पर्यायही उपलब्ध
शिवम दुबेने 2019 साली आयपीएल स्पर्धेत पहिल्यांदा भाग घेतला होता. त्यावेळी त्याने चार सामन्यात एकही विकेट घेतली नव्हती. यामध्ये त्याने 40 धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याने भारतीय संघात वनडे आणि टी-20 पदार्पण केले होते. मात्र त्याला आपला ठसा उमटवता आला नव्हता. शिवम दुबे 12 टी-20 आणि 1 वनडे सामना खेळला आहे. त्यामध्ये त्याने टी-20 मध्ये 5 विकेट घेतल्या आहे. त्यामुळे तो सहावा पर्याय ठरू शकतो.