ऑस्ट्रेलियात लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या पीडितांच्या मदतीसाठी काल (9 फेब्रुवारी) मेलबर्न येथे बुशफायर क्रिकेट बॅश (Bushfire Cricket Bash) या चॅरिटी क्रिकेट (Charity Cricket) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
मेलबर्न येथे पाँटिंग एकादश विरुद्ध गिलख्रिस्ट एकादश या संघात सामना पार पडला. हा सामना पाँटिंग एकादशने 1 धावेने जिंकला.
या सामन्यामधून 7.7 मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलरपेक्षा (37 कोटी रुपये) अधिक रक्कम जमा झाली आहे. न्यू साऊथ वेल्स (New South Wales) येथे लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या पीडितांच्या मदतीसाठी जमा करण्यात आलेल्या या रकमेची माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्विटरवरून दिली होती.
https://twitter.com/KevRobertsCA/status/1226486668703617024
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाँटिंग एकादशने 10 षटकात 5 बाद 104 धावा केल्या. यामध्ये विंडीजचा माजी फलंदाज ब्रायन लाराने 11 चेंडूत 30 धावा केल्या. यात 2 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश होता. तसेच रिकी पाँटिंगने (Ricky Ponting) 4 चौकारांच्या मदतीने 26 धावा केल्या.
पाँटिंग एकादशने दिलेल्या 104 धावांचा पाठलाग करताना गिलख्रिस्ट एकादशकडून फलंदाजी करताना शेन वॉट्सन (Shane Watson) आणि गिलख्रिस्टने (Gilchrist) 49 धावांची भागीदारी केली. यामध्ये गिलख्रिस्टने 17 धावा केल्या तर वॉट्सनने 30 धावा केल्या होत्या. अँड्र्यू सायमंड्सने 13 चेंडूत 29 धावा केल्या. परंतु, गिलख्रिस्ट एकादशच्या फलंदाजांना हा सामना जिंकता आला नाही.
यावेळी पाँटिंग एकादशकडून गोलंदाजी करताना वेगवान गोलंदाज ब्रेट लीने 2 तर ल्यूक हॉजने 1 विकेट घेतली.
त्याचबरोबर पाँटिंग एकादश संघाचा प्रशिक्षक मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने (Sachin Tendulkar) साडे पाच वर्षांनंतर पहिल्यांदा फलंदाजी केली. यावेळी सचिनने सामन्यादरम्यानच्या ब्रेकमध्ये ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू एलिसा पेरीच्या (Ellyse Perry) गोलंदाजीवर 1 षटक फलंदाजी केली. यावेळी सचिनने पेरीच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारला.






