ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व माजी कर्णधार कॅमेरून व्हाईट याने शुक्रवारी रात्री उशिरा, सिडनी येथे आपण सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत होत असल्याची घोषणा केली. व्हाईटने ऑस्ट्रेलियासाठी १४२ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. निवृत्तीनंतरही, क्रिकेटशी जोडून राहण्याचा आणि प्रशिक्षक म्हणून आपली नवीन कारकीर्द सुरू करण्याचा मनोदय त्याने बोलून दाखवला.
२००५ ते २०१८ पर्यंत ऑस्ट्रेलियन संघाकडून ४ कसोटी, ९१ वनडे आणि ४७ टी २० आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला व्हाईट यापुढे देशांतर्गत क्रिकेटदेखील खेळणार नाही. ३७ वर्षीय कॅमेरून व्हाईट आपल्या प्रशिक्षण कारकिर्दीची सुरूवात मेलबर्न क्रिकेट क्लबपासून करणार आहे.
ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या संकेतस्थळाशी बोलताना ऑस्ट्रेलियाच्या या माजी कर्णधाराने म्हटले की, ” आजपासून माझे एक व्यावसायिक खेळाडू म्हणून क्रिकेट संपले आहे. यापुढे मी कोठेही व्यवसायिक क्रिकेटपटू म्हणून सहभागी होणार नाही. माझा अॅडलेड स्ट्रायकर्सशी असलेला एक वर्षाचा करार पूर्ण झाला आहे. मला अजून काही दिवस खेळण्यापेक्षा युवा खेळाडूंना संधी देणे गरजेचे वाटते. माझ्याकडे क्रिकेटला देण्यासारखे अजून खूप काही आहे. आगामी काळात प्रशिक्षकाची भूमिका निभावायला मला आवडेल. ”
ऑस्ट्रेलियाकडून ४ कसोटी, ९१ एकदिवसीय आणि ४७ टी२० सामने खेळणारा कॅमेरून व्हाइट ४७ आयपीएल सामने देखील खेळला आहे. २०१२ व २०१३ आयपीएलमध्ये कुमार संगकाराच्या अनुपस्थित व्हाईटने सनरायझर्स हैदराबाद संघाचे नेतृत्व देखील केले होते. यासोबत, तो ऑस्ट्रेलियाच्या टी२० संघाचा कर्णधार देखील राहिला आहे.
फलंदाज म्हणून व्हाईटने ऑस्ट्रेलियाकडून ४ कसोटी सामन्यात १४१, ९१ एकदिवसीय सामन्यात २०७२, ४७ टी २० सामन्यात ९८४ आणि आयपीएलच्या ४७ सामन्यात ९५४ धावा केल्या आहेत. कामचलाऊ लेगस्पिनरची जबाबदारी पेलताना त्याने कसोटीत ५, एकदिवसीय सामन्यात १२ तर टी२० आणि आयपीएलमध्ये प्रत्येकी १-१ बळी आपल्या नावे केला आहे.






