इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 चा हंगाम 22 मार्चपासून सुरू होत आहे. मात्र यावेळी आयपीएल सुरू होण्यापूर्वीच अनेक मोठे आणि धक्कादायक निर्णय पाहायला मिळाले. यावेळी ट्रान्सफर विंडो अंतर्गत आयपीएल इतिहासातील सर्वात मोठा ट्रेड दिसून आला.
गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला त्याच्या जुन्या संघ मुंबई इंडियन्सनं खरेदी केलं. याशिवाय त्याला रोहित शर्माच्या जागी कर्णधारही बनवण्यात आलं. मात्र यामुळे रोहितचे चाहते चांगलेच संतापले आहेत. रोहितनं त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला पाच वेळा आयपीएलचं विजेतेपद मिळवून दिलं आहे.
दरम्यान, टीम इंडिया आणि चेन्नई सुपर किंग्जचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायडूनं एक मोठं वक्तव्य केलं. रोहित आणखी 5-6 वर्ष आरामात आयपीएल खेळू शकेतो, असा त्याला विश्वास आहे. तसेच धोनीच्या निवृत्तीनंतर तो सीएसकेचं कर्णधारपदही सांभाळू शकतो, असं धक्कादायक वक्तव्य त्यानं केलं. आयपीएल 2025 च्या आधी एक मेगा लिलाव होणार आहे. त्यामुळे रायुडूच्या बोलण्यात वजन असल्याचं दिसून येतं.
असं असली तरी सध्याच्या सीझनमध्ये रोहितला संघ बदलणं अशक्य आहे. याचं मुख्य कारण म्हणजे आता आयपीएल ट्रान्सफर विंडो बंद झाली आहे. म्हणजेच आता कोणत्याही खेळाडूचा ट्रेड करता येणार नाही. दरम्यान, चाहत्यांच्या मनात प्रश्न नक्कीच येत असतील की ही ट्रान्सफर किंवा ट्रेड विंडो काय आहे आणि तिचे नियम काय आहेत? याचा फायदा खेळाडूंनाही होतो का? चला तर मग या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया…
जेव्हा एखादा खेळाडू ट्रान्सफर विंडोमध्ये आपला संघ सोडून दुसऱ्या फ्रँचायझीकडे जातो तेव्हा त्याला ट्रेड म्हणतात. हा व्यापार दोन प्रकारे होतो. पहिला म्हणजे रोखीनं. यामध्ये खेळाडूला विकणाऱ्या फ्रँचायझीला पैसे मिळतात. दुसरा म्हणजे, दोन फ्रँचायझी त्यांच्या खेळाडूंची देवाणघेवाण करतात.
नियमांनुसार, ही हस्तांतरण किंवा व्यापार विंडो आयपीएल हंगाम संपल्यानंतर एक महिन्यानंतर उघडते. पुढील हंगामाच्या लिलावाच्या एक आठवड्यापूर्वी ती खुली राहते. तसेच, ही विंडो लिलावानंतर पुन्हा उघडते, जी पुढील आयपीएल हंगाम सुरू होण्याच्या एक महिना आधी बंद होते.
अशा स्थितीत सध्याची व्यापार विंडो गेल्या वर्षी 12 डिसेंबरपर्यंत खुली होती. 19 डिसेंबर रोजी दुबईमध्ये लिलाव झाला. ही विंडो 20 डिसेंबरपासून पुन्हा उघडली, जी आयपीएल 2024 हंगाम सुरू होण्याच्या एक महिना आधी बंद करण्यात आली होती. म्हणजेच ही ट्रान्सफर विंडो आता बंद आहे. ही ट्रेडिंग विंडो 2009 मध्ये सुरू झाली होती. पहिला करार मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता दिल्ली कॅपिटल्स) यांच्यात झाला. त्यावेळी आशिष नेहराच्या बदल्यात मुंबईला शिखर धवन मिळाला होता.
जेव्हा एखादा खेळाडू सर्व-कॅश डीलमध्ये टीम A मधून टीम B मध्ये जातो तेव्हा त्याला एकतर्फी ट्रेड म्हणतात. यामध्ये टीम B ला खेळाडूच्या बदल्यात रोखीनं किंमत द्यावी लागते, जी विक्री करणाऱ्या टीमनं लिलावादरम्यान त्या खेळाडूला खरेदी करण्यासाठी दिली होती. यावेळी हार्दिक पांड्याच्या बाबतीतही असंच घडलं.
दुतर्फा ट्रेड म्हणजे काय?
यामध्ये, दोन्ही संघांमध्ये खेळाडूंची देवाणघेवाण होते. परंतु या कालावधीत खरेदी करणाऱ्या संघाला दोन खेळाडूंमधील किमतीतील तफावत भरावी लागते. याला दुतर्फा ट्रेड म्हणतात.
जेव्हा जेव्हा एखाद्या खेळाडूचा ट्रेड केला जातो तेव्हा त्या खेळाडूची मान्यता खूप महत्त्वाची असते. गुजरात टायटन्सचे क्रिकेट संचालक विक्रम सोलंकी यांनी सांगितलं की, हार्दिकनं स्वतः मुंबई संघात परतण्याची इच्छा व्यक्त केली होती. हा व्यापार 15 कोटी रुपयांमध्ये झाला. जर एखाद्या खेळाडूला ट्रेड विंडो अंतर्गत दुसऱ्या संघात जायचं असेल आणि त्याची फ्रेंचायझी त्यास सहमत नसेल तर हा करार केला जाऊ शकत नाही. म्हणजेच, नियमांनुसार, फ्रँचायझीची मान्यताही ट्रेडसाठी खूप महत्त्वाची असते.
2010 मध्ये, रवींद्र जडेजानं त्याच्या संघ राजस्थान रॉयल्ससोबत नवीन करार केला नाही. त्यावेळी त्याच्यावर नवीन करारासाठी मुंबईशी बोलणी केल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी जडेजावर एका हंगामाची बंदी घालण्यात आली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
लिजेंड्स लीगच्या तिसऱ्या सीझनचं वेळापत्रक जाहीर, जागतिक क्रिकेटमधील बडे स्टार्स उतरतील मैदानात
ऋषभ पंत IPL 2024 खेळण्यासाठी फीट; मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा स्पर्धेतून बाहेर
सूर्यकुमार यादव IPL 2024 च्या पहिल्या दोन सामन्यातून बाहेर होण्याची शक्यता