भारतीय संघाला केपटाऊन कसोटीच्या शेवटच्या डावात विजयासाठी 79 धावांचे लक्ष्य मिळाले. बुधवारी (3 जानेवारी) सुरू झालेला हा दुसरा आणि मालिकेतील शेवटचा कसोटी सामना अवघ्या दोन दिवसांमध्ये संपण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिका संघ सामन्यातील दुसऱ्या डावात ऍडेन मार्करम याच्या शतकामुळे 176 धावांपर्यंत मजल मारू शकला. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात यजमानांनी सर्व विकेट्स गमावल्या.
पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात दक्षिण आफ्रिका संघाचा दुसरा डाव सुरू झाला. पहिल्या दिवसाखेर आफ्रिकी संघाची धावसंख्या 3 विकेट्सच्या नुकसानावर 62 धावा होती. सलामीवीर ऍडेन मार्करम 36 आणि डेव्हिड बेडिंगहॅम 7 धावांसह खेळपट्टीवर कायम होते. दुसऱ्या दिवसी या दोघांनीच आफ्रिकेसाठी डावाची सुरुवात केली. दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज एका बाजूने नियमित अंतरावर विकेट्स गमावत राहिले. पण मार्करम खेळपट्टीवर चिकाटीने धावा करत राहिला. त्याने 99 चेंडूत स्वतःचे शतक पूर्ण केले. तर 103 चेंडूत 106 धावा केल्यानंतर रोहित शर्मा याच्या हातात झेल दिल्यामुळे विकेट गमावली. मोहम्मद सिराज याने मार्करमला हा चेंडू टाकला होता.
मार्करमव्यतिरिक्त या डावात दक्षिण आफ्रिकेसाठी एकही फलंदाज 12 धावांपेक्षा मोठी खेळी करू शकला नाही. भारतासाठी जसप्रीत बुमराह याने 13.5 षटकांमध्ये 61 धावा खर्च करून 6 विकेट्स नावावर केल्या. मुकेश कुमार याने 10 षटकात 56 धावा दिल्यानंतर 2 विकेट्स मिळवल्या. तसेच मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनीही प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
तत्पूर्वी पहिल्या डावात भारताने दक्षिण आफ्रिकेला अवघ्या 55 धावांवर सर्वबाद केले होते. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेसाठी एकही फलंदाज 15 धावांपेक्षा मोठी खेळी करू शकला नव्हता. मोहम्मद सिराज याने सर्वाधिक 6 विकेट्स, तर जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय फलंदाजांची अवस्था देखील आफ्रिकेने खराब केली होती. कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी आणि नांद्रे बर्गर यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या होत्या.
आता दुसऱ्या डावात यजमान संघाचे गोलंदाज कशी कामगिरी करतात, यावर सर्वांचे लक्ष्य असेल. भारतासाठी हे 79 धावांचे लक्ष्य मोठे नाही. पण पहिल्या तीन इनिंग्जमध्ये गोलंदाजांनी मिळणारी साथ पाहता या धावा करताना भारतीय फलंदाजांचा घाम निघू शकतो. अशात फललंदाजांना संयमी खेळी करून संघाला विजय मिळवून द्यावा लागेल. (Cape Town Teat । India requires 79 runs to secure victory in the 2nd Test and draw the series!)
महत्वाच्या बातम्या –
कौतुक करावं तितकं कमीच! प्रतिकूल परिस्थितीत मार्करमचं सुरेख शतक, डीन एल्गरला ट्रिब्यूट
SA vs IND । दुसऱ्या दिवशी केपटाऊनमध्ये बुमराहचीच हवा, केली भारताचा सर्वोत्तम पेसर मसजल्या जाणाऱ्या दिग्गजाची बरोबरी